सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक किनगाव राजा येथे संपन्न
सिंदखेडराजा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- समाधान सरकटे:- मौजे किनगाव राजा येथे सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदर प्रात्यक्षिकामध्ये तालुका कृषी अधिकारी पांचाळ साहेब यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांनी अगोदर रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी पेरणीच्या दोन तास अगोदर जीवाणू संघ याची बीज प्रक्रिया करावी अशी त्यांनी माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी जगताप साहेब यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक पी.जे. कांगणे साहेब यांनी बुरशीजन्य रोग व खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगून सर्व शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन त्यांनी केले. श्री बगाडे साहेब कृषी सहायक यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कांगणे साहेब यांनी केले व श्री बगाडे साहेब यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आकाश शेळके ,सुरेश सानप, बाबुराव साळवे, संतोष हरकळ, पंढरी कुठे, सय्यद मूर्तिजा अली, श्याम महाजन,सादिक सय्यद सलाउद्दीन शेख, रामा गिराम, राजू काकड, किशोर हरकळ इत्यादी शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.