कोथळीत आले ते तिघं बकऱ्या चोरण्यासाठी मात्र नागरिकांनी त्यांना जाम बदाडले
मोताळा :- आपलं बुलढाणा जिल्हा. बातमी- बकऱ्या चोरणाऱ्या तीन जणांना १६ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास कोथळी येथे नागरिकांनी पकडले. यावेळी तिघांना संतप्त नागरिकांनी चोप देत बकऱ्या घेऊन जाणाऱ्या कारची तोडफोड केली. त्यानंतर चोरट्यांना बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कोथळी येथे १६ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास खामगाव तालुक्यातील चितोडा येथील सुरज आनंदा हिवराळे, आशिष रवींद्र वानखेडे, रविकांत जनार्दन हिवराळे हे तीन चोरटे स्विफ्ट डिझायर कारमधून बकऱ्या चोरी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कोथळी येथील शे. जावेद शे. रशीद यांची बकरी चोरी करून स्विफ्ट डिझायर कारमध्ये घेऊन जाताना चिंतामणी मंदिराजवळ नागरिकांनी पाहिले. तेव्हा त्यांना थांबवून संतप्त नागरिकांनी चोप देत चोरीची बकरी घेऊन जाणाऱ्या कारची तोडफोड केली. बकरी मालक शे. जावेद यांना फोनवरून माहितीही देण्यात आली. बकरी मालक यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता त्या कारमधील बकरी ही त्यांची दिसून आली. सदर माहिती बोराखेडी पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तिघांना वाहनासह ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी कोथळी येथील शे. जावेद शे. रशीद यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरज हिवराळे, आशिष वानखेडे आणी रविकांत हिवराळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत तायडे आणि पोलिस कॉन्स्टेबल सुनील भवटे हे करीत आहेत. दोन दिवसापूर्वी बुलढाणा शहरातूनही ८ बकऱ्या एका चार चाकी वाहनाद्वारे चोरून नेण्यात आल्या होत्या.