जुन्या भांडणावरून त्याने दिली जीवे मारण्याची धमकी
खामगाव : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- जुन्या भांडणाच्या कारणावरून एकास अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना खामगाव तालुक्यातील देऊळखेड शहापूर येथे दुपारी घडली. तक्रारीनुसार, पुरुषोत्तम लहुजी तायडे (५०) हे बुधवारी दुपारी देऊळखेड शहापूर येथील महापुरुषाच्या पुतळ्याजवळ बसले होते.
त्यावेळी संशयित गौतम डिंगाबर तिडके (३५, रा. शहापूर) हा तिथे आला. १२ मे रोजी झालेल्या भांडणाचे कारण उकरून काढत, हातात काठी घेऊन तो पुरुषोत्तम लहुजी तायडे यांच्या अंगावर धाऊन गेला. सोबतच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी संशयिताविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करत आहे. जुन्या वादाची यास किनार आहे.