वाघजाळ फाट्याजवळ शॉक लागून विद्युत सहाय्यकाचा मृत्यू
वीज पुरवठा सुरळीत करताना घडली घटना
मोताळा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-: विद्युत खांबावर कृषी क्षेत्राचा वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या विद्युत सहायकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि. १७ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाघजाळ फाट्यानजीक घडली. गुणवंत सांगवे (रा. लिहा) असे मृतकाचे नाव आहे.
विद्युत वितरण विभागामध्ये मोताळा भाग दोनमध्ये ते विद्युत सहायक म्हणून कार्यरत आहे. सुसाट वाऱ्यामुळे टाकळी परिसरातील कृषी क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे गुणवंत सांगवे हे सहकाऱ्यांसह दि. १७ मे रोजी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले होते. यासाठी त्यांचे वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी परवानगी घेऊन त्या भागातील विद्युत पुरवठा बंद केला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाघजाळ फाट्याजवळील विद्युत खांबावर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीता असताना गुणवंत सांगवे यांना शॉक लागून ते खाली पडले.
तातडीने त्यांना बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आर. तायडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली.