लग्नासाठी जबरदस्ती करत असताना महिलेने विरोध केला असता चाकू हल्ला करून केले जखमी
मोताळा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील एका तीस वर्षीय महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध धामणगाव बढे पोलिसांनी २० मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.
अबू बकर उर्फ अली मेहमूद शाह (३०) राहणार इकबाल चौक, बुलढाणा,असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. आरोपी व पीडित महिला एकाच समाजाचे आहेत. ही घटना १९ मे रोजी घडली होती. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा त्यांच्या घरी येऊन लग्नासाठी जबरदस्ती करायला लागला होता. पीडित महिलेसह तिच्या आईने विरोध केला असता, आरोपीने पीडित महिलेस मारहाण करून हल्ला केला. यामुळे पीडित महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिस आरोपीचा शोध घेत असून, ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बबन रामपुरे हे पुढील तपास करत आहेत.