पती-पत्नीच्या वादाचा एसटी बसमध्ये झाला राडा
पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
खामगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- चिडलेल्या पतीने चक्क चालकासोबतच वाद घालून माझ्या पत्नीला बसच्या खाली उतरून द्या असे म्हणत राडा केला. त्यामुळे प्रवाशांना तर त्रास झालाच व या एसटी बसच्या उर्वरित बस फेऱ्याही रद्द झाल्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे ही नुकसान झाले. या घडलेल्या प्रकाराबाबत एसटी चालकाने पिंपळगाव राजा पोस्टेला तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून राडा करणारे पती विरुध्द पिंपळगाव राजा पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० मे रोजी घडली आहे.
खामगाव आगराची एसटी बस सोमवारी सकाळी ८.३० वाजता ढोरपगावसाठी निघाली होती. ढोरपगाव येथून परत येत असताना या एसटी बस मध्ये आकाश सुभाष धुरंदर याची पत्नी बसली होती. हे पाहून आकाशने एसटी बसचा चालक ज्ञानदेव नारायण गवई यांच्यासोबत वाद घालून माझ्या पत्नीला बसच्या खाली उतरून द्या अन्यथा तुम्हाला जीवानिशी ठार मारेल असे म्हणून धमकी दिली व एसटी बस समोरच राडा केला. त्यामुळे प्रवाशांनी आकाशला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे बराच वेळ हा वाद चालला. परिणामी एसटी चालक ज्ञानदेव गवई यांनी पिंपळगाव राजा पोस्टेला धाव घेऊन घडलेल्या या प्रकाराबाबत तक्रार दिली. त्यामुळे पिंपळगाव राजा पोलिसांनी आरोपी आकाश धुरंदर वय २५ वर्ष रा. ढोरपगाव विरुद्ध शासकीय कामात अरथडा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे मात्र एसटीमधील इतर प्रवाशांना नाहकचा त्रास सहन करावा लागला व या बसच्या इतर फेऱ्याही रद्द झाल्या. याबाबत अधिक तपास पिंपळगाव राजा पोस्टचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ देशमुख करीत आहेत.