शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली व्यवसायिकाला साडेबारा लाख रुपयांचा बसला गंडा
- खामगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवून देण्याच्या भुलथापा देऊन भामट्याने शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल साडेबारा लाखांनी फसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यवसायिकाच्या तक्रारीवरून बुलढाणा सायबर पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव शहरातील व्यावसायिक साकेत प्रेम सराफ वय ४८) रा. अकोला रोड खामगाव यांना काही दिवसापूर्वी त्यांच्या मोबाईल क्रमांकवर मॉर्गन स्टेनले बिजनेस स्कूल या नावाने शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीबाबत एका अनोळखी व्यक्तीकडून विचारणा करण्यात आली. यावेळी सदर शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीमध्ये मोठा नफा मिळत असल्याचे भासवून साकेत सराफ यांचा विश्वास संपादन करून सदर अनोळखी व्यक्तीने त्यांना असिस्टंट लिंडा चाट नाव असलेले एक एप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे सांगितले. त्यावरून त्यांनी सदर एप्लीकेशन डाउनलोड केले असता त्यामध्ये भरपूर नागरिक गुंतवणूक करत असल्याचे दिसून आले. यावरून सराफ हे सुध्दा शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीमध्ये सहभागी झाले. त्यांनी त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यामधून आयएमपीएस द्वारे अज्ञात व्यक्तीने दिलेल्या उदय डिजिटल वे ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या बनावट कंपनीच्या खाते क्रमांक मध्ये वेगवेगळ्या तारखेला एकूण १२ लाख ५५ हजार रुपये शेअर म्हणून गुंतवणूक केले. परंतु त्यांना कुठलाही नफा मिळत नसल्याचे दिसून आले व संबंधित अनोळखी इसमाने शेअर मार्कटिंगच्या नावाखाली त्यांची फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी साकेत सराफ यांनी बुलढाणा सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दिली असून तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध कलम ४१९, ४२० सहकलम ६६ (क) माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम २००८ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बुलढाणा सायबर सेलचे पो. नि. अशोक रत्नपारखी हे करीत आहेत.