उद्योग पूरक वातावरण करून निर्यात वाढविणार-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
निर्यात कक्ष स्थापन करण्यात येणार क्लस्टर निर्मितीतून उद्योगांना चालना रिक्त भूखंडाचे वाटप होणार
बुलडाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- जिल्ह्याची उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. या उत्पादनक्षम असलेल्या जिल्ह्यात प्रामुख्याने कृषि मालावरील प्रक्रिया उद्योग उभारणीस वाव आहे. उद्योग करण्यास पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांना जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण पुढाकार व सहकार्य करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण तयार करून निर्यातील चालना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
निर्यात प्रचलन समिती, आजारी उद्योग आणि स्थानिकांना रोजगार मिळविण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, व्यवस्थापक सुनील पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र व्यवस्थापक श्री. राऊत, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक रोहित गाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग उभारणीसाठी समोर येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. त्यासोबतच नागपूर येथील केंद्र शासनाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहकार्याने येत्या काळात जिल्ह्यात निर्यात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतची प्राथमिक बोलणी झाली आहे. या कक्षाचा लाभ स्थानिक उद्योजकांना होणार असून जिल्ह्यातील निर्यात वाढण्यास मदत होईल. गेल्या वर्षी 768 कोटींची निर्यात झाली, तर यावर्षी आतापर्यंत 841 कोटींची निर्यात झाली आहे. जिल्ह्याच्या या कामगिरीमुळे उत्कृष्ट निर्यातीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात येणार आहे. निर्यात वाढ होण्यासाठी साठवण क्षमता उपलब्ध करण्यासोबतच वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी नवउद्योजक समोर येत आहेत. त्यांना औद्योगिक वसाहतीतील भूखंड देण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेऊन सध्या रिकामे असलेले भूखंड कार्यान्वित नसल्याची खात्री करून हे भूखंड वाटप करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच रिक्त भूखंडाची माहिती त्यांच्या आरक्षणासह जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच खामगाव, देऊळगाव राजा येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत आणि मोताळा येथे नवीन एमआयडीसी प्रस्तावित आहे. लवकरच येथील भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते, वीज, पाणी आदी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी खवा आणि गारमेंट क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या काळात फर्निचर, वेल्डींग, अन्न प्रक्रिया यांचे क्लस्टर तयार करून या उद्योगांना गती देण्यात येणार आहे. जिल्ह्यात बचतगटही विविध उद्योगात कार्यरत आहेत. त्यांनाही या क्लस्टर योजनेत सहभागी करून उत्पादनासाठी त्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील क्लस्टरसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकासाच्या योजना राबविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने स्थानिक गरजा लक्षात घेऊन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात दिव्यांग व्यक्तींनाही सामावून घेतले जाणार आहे.
जिल्ह्यातील निर्यातक्षम उत्पादनांचा शोध घेण्यात येणार आहे. गेल्या काळात सफेद मुसळीची निर्यात अधिक प्रमाणात होत आहे. याला शास्त्रोक्त आधार मिळावा यासाठी जीआय मानांकन मिळण्यासाठी प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच इतर कृषि उत्पादनांनाही जीआय मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच निर्यातीबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा, जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. एक जिल्हा, एक उत्पादनामध्ये कापूस आणि सीड हब निश्चित करण्यात आले आहे. बियाण्यांचे हब तयार करण्यासाठी बियाणे कंपन्यांनाही सहभागी करून घेतले जोणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक लाभ देण्यात आला आहे. उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा, कुशल मनुष्यबळ पुरवठा, निर्यातीसाठी संपूर्ण सहकार्य, उत्कृष्ट दर्जाचे मानांकन मिळविण्यासाठी सहकार्य करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या एकत्रिक उद्योग विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्मिती होण्यास मदत मिळणार आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.