आरोग्य सेवक पदावर नौकरी लावून देतो म्हणाला; अन ३ लाख ८८ हजार घेवून खोटे नियुक्ती पत्र देवून गेला!
खामगाव तालुक्यातील सोपान चौक, विश्वनाथ चौके विरुद्ध गुन्हा दाखल!
खामगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचे कार्ड असेल तर तुमच्या मुलाला आरोग्य सेवक पदावर नौकरी लावून देतो असे सांगून ३ लाख ८८ हजार घेवुन खोटे नियुक्ती पत्र देवून फसवणूक केल्याची घटना खामगावच्या दुधा गावात उघडकीस आली आहे.
झाले असे की, समाधान सदाशिव पांढरे (४०)( रा. दुधा ता.खामगाव जि.बुलडाणा) यांना विश्वनाथ किसन चौके ( रा. दुधा ता.खामगाव जि.बुलडाणा) याने तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचे कार्ड असेल तर तुमच्या मुलाला आरोग्य सेवक म्हणून नौकरी लावून देतो, असे म्हणत समाधान पांढरे यांच्याकडून दारिद्र्य रेषेचे कार्ड घेतले. ९ ते २० ऑटोबर २०२३ दरम्यान नगदी २ लाख ९८ हजार रुपये पांढरे यांनी विश्वनाथ चौके यांना दिले होते. बाकी ९० हजार रुपये ऑनलाइन पाठविले असे एकूण ३ लाख ८८ हजार रुपये दिले. सोपान दिगांबार चौके (रा.पेडका ता.खामगाव जि.बुलडाणा) याने पांढरे यांच्या मुलाला आरोग्य सेवक पदाचे नियुक्तीपत्र दिले होते. मात्र मिळालेले नियुक्ती पत्र खोटे असल्याचे पांढरे यांच्या लक्षात येताच आपली फसवणूक झाली असल्याचे समाधान पांढरे यांच्या लक्षात आले. त्यांनी २१ मे २०२४ रोजी हिवरखेड पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी विश्वनाथ चौके व सोपान चौके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय सुरेश रोकडे करीत आहेत.
विशेष म्हणजे सोपान चौके याने याआधी सुद्धा अनेकांची फसवणूक केली आहे.खामगाव ग्रामीण पोलिसात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर होता.