500 ब्रास अवैध वाळूसाठा जप्त
जप्ती, लिलाव एकाच दिवशी खडकपूर्णातील बोटी नष्ट
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-: सिंदखेडराजा येथे अवैध वाळू विरुद्ध कारवाई करण्यात आली. यात तहसीलदार प्रविण धानोकर यांनी कारवाई करत 500 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला. जप्त केलेला वाळू साठा त्याच ठिकाणी लिलाव केला. ही कारवाई अभिनंदनीय असून अशाच प्रकारच्या कारवाई इतरही ठिकाणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर मेहकरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. एकाच कारवाईत 500 ब्रासचा वाळू साठा जप्त करण्याची कारवाई ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. जप्त करण्यात आलेली वाळू त्याच दिवशी जागेवर लिलाव करून संबंधितांना देण्यात आली.
सिंदखेड राजा येथे अवैध बाळू विरोधात केलेली कारवाई ही कौतुकास्पद आहे. सिंदखेड राजा येथील चमूने हे एक उत्कृष्ट उदाहरण ठेवले आहे. जिल्ह्यातील तहसिलदारांनी अवैध वाळू साठाच्या ठिकाणांचा तपास घेवून तात्काळ अशीच कारवाई करावी.
अशा संकलित केलेल्या साठ्यावर छापा टाकून जागेवरच लिलाव करावा. याबाबत संपूर्ण मदत जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. तसेच जिल्ह्यातील गाव, परिसरनिहाय वाळू माफियांची ओळख पटवावी. त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल होतील याची खातरजमा करावी, त्यांच्या विरुद्ध स्थानबद्ध किंवा एयपीडीएची कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली आहे.
सिंदखेड राजा चमूने खडकपूर्णा प्रकल्पामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटीचा शोध घेऊन वाळू उपसा साठी लागणारे साहित्य त्याच ठिकाणी नष्ट केले.