वृत्तसेवा-मुंबई- सध्या चर्चेत असलेल्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’ मध्ये अनेक अभिनेत्री झळकल्या होत्या. बॉलिवूड अभिनेत्रींनबरोबरच मराठी अभिनेत्री आणि सोशल इन्फ्लुएन्सर्सने सुद्धा या फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम १४ मे पासून २५ मे पर्यंत असणार आहे. त्यामुळे रोजच आपल्याला नट-नटींचे ग्लॅमरस लूक बघायला मिळतायत. यंदाच्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ऐश्वर्या राय व्यतिरिक सर्वांच्या नजरा आणखीन एका अभिनेत्रीवर खिळल्या होत्या. ती अभिनेत्री म्हणजे ‘अदिती राव हैदरी’. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हीरामंडी’ या वेब सिरीजमध्ये अदितीने साकारलेल्या बिब्बो जानच्या भूमिकेने सर्वांनाच वेड लावलंय. तिच्या ‘गजगामिनी वॉक’ ने तर सर्वच चाहत्यांना भुरळ पाडलीये. ‘कान’च्या रेड कार्पेटवरसुद्धा तिने स्वतःची झलक दाखवलीये. अदितीने परिधान केलेल्या ब्लॅक अँड व्हाईट गाऊनमुळे सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. या लूकमधले अदितीचे काही फोटो व्हायरल होतायत. अदिती ही एखाद्या अप्सरेसारखीच दिसतेय. तिचा हा लूक आणि सौंदर्य पाहून चाहते तिची तुलना ऐश्वर्या राय सोबत करायला लागले आहेत. ऐश्वर्यानेसुद्धा ‘कान फेस्टिव्हलच्या’ पहिल्या दिवशी ब्लॅक अँड व्हाईट गाऊन परिधान केला होता आणि त्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.
अदितीनेही ऐश्वर्याच्या पावलावर पाऊल टाकत त्याच रंगाच्या कपड्यांमध्ये चाहत्यांची मनं जिंकली येत.अदितीला पाहून चाहत्यांना ऐश्वर्या आठवली. एका चाहत्याने तर अदितीला ‘क्रोनिकल्स ऑफ नार्निया’ या चित्रपटाची राणी म्हटलंय. तर कोण म्हणतंय की ती राजकुमारी सारखी दिसतेय. अदितीचं देखणं रूप पाहून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे.अदिती काही दिवसांपासून ‘कान’ येथील तिचे फोटो शेअर करतेय. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता अधिकचं वाढली होती. अदितीने रेड कार्पेटवर कॅथरीन लँगफोर्ड आणि अजा नाओमी किंग सारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्ससोबत फोटो काढले. अदिती राव आणि ऐश्वर्या व्यतिरिक्त कियारा अडवाणी, उर्वशी रौतेला, सुनीता राजवार आणि जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या अभिनेत्रीही कान फेस्टिव्हलमध्ये दिसल्या होत्या.