अवैध वाळू विरोधात कारवाई सुरूच दोन दिवसात 2200 ब्रास अवैध वाळू जप्त
रेती साठा जप्त करण्याची सर्वात मोठी कारवाई
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथील अवैध वाळू विरोधात कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात केलेल्या विविध कारवाईत तब्बल 2200 ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. सदर जप्त केलेली वाळू शासकीय कामे, तसेच घरकुल किंवा अन्य कामासाठी आवश्यक असलेल्यांना जागीच लिलाव करून देण्यात आली आहे.
महसूल विभागाने गेल्या दोन दिवसात केलेल्या कारवाईत डिग्रस बु. येथील 500 ब्रास, निमगाव वायाळ येथे 1000 ब्रास आणि नारायण खेड येथे 700 ब्रास अशी एकूण 2200 ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली वाळू त्याच ठिकाणी लिलाव करून संबंधितांच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही वाळू तीन दिवसाच्या आत उचलण्याची निर्देशही देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, महसूल प्रशासन, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी गुरुवार, दि. 23 मे रोजी संयुक्त मोहिमेदरम्यान वाहनांवर कारवाई करण्यात केली. यात 12 टिप्पर, दोन ट्रॅक्टर, एक कार आणि चार इतर वाहने अशा एकूण 19 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे दोन लाख 18 हजार रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रितेश चौधरी, सुरेखा सपकाळ, अनुजा काळमेघ यांनी सहभाग नोंदविला.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी चिंचखेड येथील खडकपूर्णा धरणाला भेट दिली. यावेळी त्यांनी बोटी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या ठिकाणी भेट दिली. तसेच या भागातील रेतीसाठा जप्त करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील रेती साठा जप्त केलेल्या डिग्रस येथे सकाळी 11 वाजता परिवहन आणि महसूलच्या चमूसह भेट दिली. त्यांनी संपूर्ण गाव फिरून खासगी जागेतील अवैध रेती साठा शोधून जप्त करण्याच्या सूचना दिल्या. डिग्रस गावात रेती साठा जप्त करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी यांनी निमगाव वायळ गावातील रेती घाटावर जाणारे सर्व रस्ते तोडण्याच्या सूचना दिल्या. परिवहन विभागाने नंबर प्लेट नसलेल्या गावातील वाहनावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोलीस गुन्ह्यामध्ये जप्तीची कारवाई करण्याचे उर्वरित असलेली तीन वाहने जप्त करण्यात यश मिळाले.
त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दुपारी नारायण खेड गावाला भेट दिली. या ठिकाणी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या पंचानाम्यानुसार सुमारे 600 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. काल दिवसभरात एकूण 1700 ब्रास रेती साठा देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस आणि नारायणखेड गावात जप्त करण्यात आला. यात अवैध वाळू साठा आढळलेल्या शेतमालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. शेतकरी आणि युवकांनी अवैध धंद्यांमध्ये सहभागी होऊ नये, तसेच आधुनिक व उत्कृष्ट शेती करावी, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
या कारवाईत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार प्रविण धानोरकर, वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार प्रांजली पवार, ठाणेदार विकास पाटील, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांनी सहभाग नोंदवला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी चिंचखेड येथे भेट दिली. याठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्या बोटी आढळून आल्यास त्या नष्ट कराव्यात, तसेच अवैध वाहतूक करणारे रस्ते खोदुन बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यकतेप्रमाणे एनडीआरएफ पथक व इतर मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी विना क्रमांकाचे वाहने व नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. खडकपूर्णा जलशयामधील बोटी जाफ्राबादमार्गे पळुन गेल्यास याबाबत जिल्हाधिकारी जालना यांना माहिती देऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटीलं यांनी सांगितले.