गौतम बुद्धांचे शिकवण कायम दिशादर्शक – आ. श्वेताताई महाले
बुद्ध जयंती निमित्त धाड व कुंबेफळ येथे केले अभिवादन
चिखली :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वी सत्य, अहिंसा, शांती आणि प्रेमाचा संदेश जगाला देणाऱ्या गौतम बुद्धांची शिकवण आजही तेवढीच समायोजित असून आजच्या समाज जीवनाला व भविष्यतील आपल्या वाटचालीला कायमस्वरूपी दिशादर्शक असल्याचे मत आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त धाड आणि कुंबेफळ येथे दि. २३ मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन आ. महाले यांनी केले. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
आ. श्वेताताई महाले ह्या मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात नेहमी जनसंपर्क करत असतात. यादरम्यान बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी धाड येथे दौऱ्यावर असताना आ. महाले यांनी तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. याशिवाय कुंबेफळ येथे देखील आ. महाले यांनी आपल्या भेटीदरम्यान भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून सर्वांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे बुद्ध – आमदार श्वेताताई महाले
अनिष्ट व कालबाह्य रूढी, अंधश्रद्धा व मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या गोष्टींच्या विरोधात बंड पुकारणारे भगवान गौतम बुद्ध हे केवळ एक धर्म संस्थापकच नव्हे तर संपूर्ण मानवतेला मुक्तीचा मार्ग दाखवणारे महात्मा होते असे मत यावेळी आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केले. बुद्धांचा करुणेचा संदेश हा भारताच्या बाहेर देखील अनेक देशांमध्ये पोहोचला; याशिवाय जगभरात बुद्धांच्या विचाराने असंख्य लोकांना प्रभावित केले. त्यामुळेच भगवान गौतम बुद्ध हे भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी ठरत असल्याचे आ. महाले म्हणाल्या. यावेळी सर्वश्री देविदास पाटील जाधव जिल्हा सरचिटणीस भाजपा, श्रीरंग अण्णा वेंडोले जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपा, समाधान आघाव, एकनाथ वाघ, योगेश राजपूत, विशाल विसपुते शहराध्यक्ष भाजपा, टीका खान आदी मान्यवर उपस्थित होते.