वादळाने खामगावसह, मलकापूर, नांदुरा, मेहकर, जळगाव जामोद, शेगाव, संग्रामपूर तालुक्यात धुमाकूळ!
;घरावरील पत्रे उडाली, रस्त्यावरील फलक पडले,चारचाकी गाड्यांचेही नुकसान!
खामगाव – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: संध्याकाळी अचानक आलेल्या जोराच्या वादळाने खामगाव,मलकापूर, नांदुरा, मेहकर, जळगाव जामोद, शेगाव, संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे.२६ मे च्या संध्याकाळी जोराच्या वाऱ्याने खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे तीन चारचाकी, पंचवीस ते तीस दुचाकी यावर चिंचेचे झाड पडल्याने वाहनाचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद शाळा कदमापूर येथील शाळेचे टिन पत्रे उडून गेले आहेत. चार हजार चारशे केव्ही असलेल्या लाईन चे सहा टॉवर जमीनदोस्त झाले आहेत.यासह संभापुर येथील ग्रामपंचायतची कौले जोराच्या वाऱ्याने उडून गेली आहेत. खामगाव – मेहकर रोडवरील टेंभुर्णा फाट्यावरील रोडवर लावलेला फलक वाऱ्याने तुटून पडला आहे. आसलगाव येथील बाजार समितीचे शेड उडून गेले आहे. खामगाव नगरपालिका कर्मचारी यांचे निवासस्थान असलेले टॉवर चौकातील घरावरील टिनपत्रे उडाले आहेत.सुदैवाने जीवितहानी टळली आहे. अनेक ठिकाणी विजेचे तार पडल्याने बत्ती गुल झाली आहे.