किनगाव जग परिसरातील शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित !
किनगाव जग :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- परिसरात मागील वर्षी खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, परिसरातील शेतकरी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून अद्यापही वंचित आहेत. पीक विमा भरपाई रक्कम बँक खात्यात तत्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात पेरणीवेळी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने पेरणीला जवळपास एक महिना उशीर झाला होता. मूग, उडदाच्या पेरणीची वेळ निघून गेल्याने हे दोन्ही पिके हातची गेली होती. सोयाबीन, कपाशीचे पीक ऐन फुलधारणेत असताना पावसाने खंड दिल्याने फुलांची गळती झाली तर पिकांवर सोंगणीवेळी अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली. यामुळे पिकांवर केलेला खर्चही वसूल झाला नाही. शासनाकडून पिकांना सुरक्षा कवच म्हणून ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानासंदर्भात ऑनलाइन तक्रारीही केल्या आहेत परंतु, अद्यापही परिसरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा झालेला नाही. आता खरीप हंगामाची पेरणी जवळ आली आहे. त्यामुळे खते आणि बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. पीक नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाता आहे.