Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

जिल्ह्यात दिव्यांग, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सर्व्हेक्षण

सर्व्हेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

Spread the love

बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी : जिल्ह्यातील दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात येत येत आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने औरंगाबाद येथील महात्मा गांधी सेवा संघ घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाचे सर्व्हेक्षण करीत आहे. यातून जिल्ह्यातील दिव्यांग, एकल महिला, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबाची स्थिती समोर येण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या सर्व्हेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात सर्व्हेक्षण करताना मागील काळात कुटुंबातील सदस्यानी केलेली आत्महत्या, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय, आत्महत्येचे कारण, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे वय, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला असणारी मुले व मुली, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नी किंवा पतीचे नाव, कुटुंबात असणाऱ्या एकल महिला, विधवा, परित्यक्ता, तृतीयपंथी यांच्याबाबत माहिती घेण्यात येणार आहे.दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तींचे २१ प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दिव्यांग व्यक्तीच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. तसेच कायदा लागू झाल्यानंतर दोन वर्षात राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग व्यक्तीसाठी आरोग्य सुविधा, तसेच दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी उपक्रम, योजना तयार कराव्यात. त्यानुसार दिव्यांगाचे सर्वेक्षण, तपासणी आणि दिव्यांगत्वाचे कारण शोधण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे.

दिव्यांगांच्या एकूण लोकसंख्येची किंवा त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती शासनाकडे अचूक नोंद उपलब्ध होण्यासाठी सदर सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे. या सर्वेक्षणातून माहितीच्या आधारे दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगिण विकासाकरिता विविध उपक्रम व योजनांचे नियोजन करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तीकरीता योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माहितीचे संकलन करणे, दिव्यांग व्यक्ती विषयक संशोधन करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, गरजा ओळखणे व त्यांचे सर्वांगीण पुनर्वसन करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने माहिती संकलित करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येत आहे.दिव्यांगांना आरोग्य, रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, प्रशिक्षण, दिव्यांगत्वाचे कारण समजून घेण्याकरिता समाजामध्ये जागरूकता मोहीम राबविणे, लहान वयातच दिव्यांगत्व ओळखून, ते कमी करण्यासाठी, त्याचा शोध घेवून शीघ्र निदान व त्वरीत उपचार करणे, त्यांच्या पुनर्वसनास प्रोत्साहन देणे आदी उपाययोजना करण्‍यासाठी दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण सुरू आहे.

दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण जिल्ह्यातील सर्व शहरे, गावे, वाडी-वस्ती, तांडे व पाड्यामध्ये करण्यात येणार आहे. तसेच सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, कटक मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे. सर्व्हेक्षण करण्यासाठी आशा गट प्रवर्तकांकडून गावस्तरावरील आशा, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी लोकप्रतिनिधींनाही सहभागी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page