बुलडाणा येथे 10 जूनला होणार डाक अदालत
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : बुलडाणा येथील डाक घर अधीक्षक कार्यालयात सोमवार, दि. 10 जून रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना, संभाष, पत्रव्यवहार किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार होते. या तक्रारींचा योग्यप्रकारे निवडा करण्यासाठी डाक अदालत घेण्यात येते. त्यात पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडवितात.
पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यांच्या आत तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यास अशा तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातात. यासाठी तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. यात तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असल्यास त्याचे नाव व हुद्दा याची माहिती देण्यात यावी. डाक सेवेबाबत तक्रार असल्यास गणेश आंभोरे, अधीक्षक डाक घर, बुलडाणा विभाग, बुलडाणा 443001 यांच्या नावे दोन प्रतीसह दि. 7 जून 2024 पर्यंत पोहोचतील असे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.