आरटीई प्रवेश प्रक्रिया सुधारित सूचनांनुसार राबविणार
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सन 2024-25 या वर्षातील आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या सुधारीत सूचना शिक्षण संचालक, प्राथमिक, पुणे कार्यालयाकडून निर्गमित झाल्यानंतर राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अंतर्गत दुर्बल, वंचित शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग बालकांचे इयत्ता पहिली व पूर्व प्राथमिक वर्गस्तरावर कमीत कमी 25 टक्के प्रवेश राखीव ठेवण्यात तरतूद आहे. त्यानुसार 2024-25 या वर्षाची प्रवेश प्रक्रिया दि. 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेद्वारे सुधारीत निकषानुसार सद्यस्थितीत राबविण्यात येत आहे. मात्र शासनाच्या 2024-25 या वर्षातील निर्गमित सुधारीत अधिसूचनेविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, रिट याचिका दाखल झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने शासनाच्या दि. 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या सुधारीत अधिसूचनेस स्थगिती दिली आहे. सन 2024-25 या वर्षाची आरटीई प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच्या नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल आरटीई पोर्टलवर करण्याबाबत निर्देश दिले आहेत. स्वयं अर्थसहायीत शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगर पालिका शाळा स्वयं अर्थसहायीत शाळा यांचा समावेश करुन आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने अधिसूचना निर्गमित करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.त्यामुळे शिक्षण संचालक यांच्याकडून प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांना यथावकाश कळविण्यात येणार आहे. याची नोंद जिल्ह्यातील तालुकास्तर कार्यालये, आरटीई शाळांचे मुख्याध्यापक आणि पालकांनी घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.