शेतशिवारातून ४४ हून अधिक स्प्रिंकलर तोट्या चोरट्यांनी केल्या लंपास
शेतकऱ्यांचे नुकसान देऊळगाव घुबे, मिसाळवाडी परिसरात चोरट्यांचा धिंगाना...
चिखली :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील देऊळगाव घुबे, मिसाळवाडी, भरोसा, कोनड आदी भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून आता तर शेतातील साहित्य देखील सुरक्षित राहिले नसल्याचा प्रत्यय २८ मे रोजी मिसाळवाडी शेतशिवारात आला आहे. या भागातील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी लावलेल्या स्प्रिंकलर तोट्या चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या तालुक्यातील मिसाळवाडी येथील चार शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरच्या तोट्या एका रात्रीतून लंपास झाल्याची बाब समोर आली आहे. सद्यःस्थितीत उन्हाळी पिके, फळबागा, वाचविण्यासाठी भाजीपाला पिके शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी स्प्रिंकलरचा वापर चालविला आहे.
या स्प्रिंकलरला असलेल्या सुमारे ४४ हून अधिक तोट्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. यामध्ये मिसाळवाडी येथील शेतकरी राजू मिसाळ यांच्या शेतातील स्प्रिंकलरच्या १२ तोट्या, नारायण गुरुजी यांच्या १३, भरत भगत यांच्या १० तर सतीश भगत
यांच्या ९ स्प्रिंकलर तोट्यांची चोरी झाल्याची माहिती आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अंढेरा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, शेतशिवारातील या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानीसह शेती सिंचनाचाही प्रश्न निर्माण झाला असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत. याकडे पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन चोरट्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. खरीप हंगाम समोर असताना तोट्या लंपास झाल्यास शेतकरी संकटात सापडले आहेत.