बिबट्याच्या हल्ल्यात ६ मेंढ्या ठार, ५ जखमी ढोरपगाव शिवारातील नागरिकांमध्ये भिती
खामगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील ढोरपगाव शिवारातील एका गोठ्यात घुसून बिबट्याने ६ मेंढ्यांचा फडशा पाडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात इतर ५ मेंढ्यासुध्दा जखमी झाल्या आहेत.
ढोरपगाव येथील शेतकरी विठ्ठल किसन कवडे यांचा गावालगत गोठा असून त्या ठिकाणी ते मेंढ्या बांधून ठेवतात. नेहमी प्रमाणे कवडे यांनी काल २७ मे च्या रात्री गोठ्यात मेंढ्या बांधून ठेवल्या व गोठा बंद करून ते घरी गेले. दरम्यान रात्री बिबट्याने कवडे यांच्या गोठ्यात घुसून मेंढ्यांवर हल्ला चढविला. यात ६ मेंढ्या मरण पावल्या असून ५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून ढोरपगाव शिवारात. बिबट्याची दहशत निर्माण झालेली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने बिबट्याची दहशत रोखण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.