अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळणार तीन कोटींपर्यंत अनुदान
शेतकरी उत्पादक कंपन्यांसह गटांना प्राधान्य
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- स्थानिक, स्वदेशी, गावरान, सेंद्रिय पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यात कृषी प्रक्रिया उद्योजक उभारणीसाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के, तसेच कमाल तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यात शेतकरी उत्पादक कंपन्यांसह शेतकरी गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तरवृद्धीसाठी या योजनेतून एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डीग आदी करिता अर्थसहाय्य देण्यात येत आहे. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख तर सामाईक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन केंद्र, मुल्यसाखळी घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमाल ३ कोटी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.
उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था, तसेच गट लाभार्थीमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, शासकीय संस्थांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा.
प्रकल्प आराखडे तयार करणे, बँकेकडे सादर करणे, तसेच नोंदणीसाठी कृषी विभागाकडून जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत सहाय्य केले जाणार आहे. आत्मातील नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प करतेवेळी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेसोबत कृषी पायाभूत योजनेची सांगड घातल्यास अनुदानासोबत तीन टक्के व्याजात सवलत मिळणार आहे.
जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजना सन २०२३-२४ अंतर्गत वैयक्तिक घटकांचे ४३७ लक्षांक प्राप्त झाले आहे. त्यापैकी ३९१ लक्षांक साध्य झाले आहेत. यात ३९१ लाभार्थींना १३.५० कोटी रुपयाचे अनुदान कृषि विभागामार्फत वितरीत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३९१ उद्योग सुरु करण्यात आले आहे. २०२४-२५ करिता वैयक्तिक घटकांचे लक्षांक ४१५ प्राप्त झाले आहे. यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावे, अर्ज करताना कृषि सहाय्यक आणि तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवरील माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.