शहरातील धक्कादायक घटना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या
बुलडाणा( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):- बुलढाणा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील सुंदरखेड भागातील काँग्रेसनगर तार कॉलनी परिसरात सत्यम अपार्टमेंट येथे राहणाऱ्या डॉक्टरने सायंकाळी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉक्टर पंकज सुभाष शिंगणे (४३ वर्ष) असे आत्महत्याग्रस्त डॉक्टरचे नाव आहे. डॉ. शिंगणे हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुर्वेद विभागात कार्यरत होते. सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. डॉ. शिंगणे यांनी घरी कोणी नसताना गळफास लावला. दरम्यान, सायंकाळी नातेवाईकांनी दरवाजा उघडला तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सरळ साध्या स्वभावाचे डॉक्टर म्हणून त्यांना सर्वजण ओळखत होते त्यांच्या मृत्यूच्या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे . घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.सध्या डॉ.शिंगणे यांचे शव विच्छेदनाचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात सुरू आहे.