धोत्रा भनगोजी येथील काकाच्या खून प्रकरणात तिघांवर गुन्हे दाखल
दोघांना पोलिसांनी केली अटकः एक जण झाला फरार, शेतीच्या वादातून झाला होता खून
चिखली :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- शेतीचा वाद विकोपाला गेल्याने सख्ख्या पुतण्याने ट्रॅक्टरद्वारे काकाचा खून केल्याची घटना ६ जूनच्या सायंकाळी घडली होती. या प्रकरणी मृताच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांवर खुनासह इतर गुन्हे दाखल केले आहेत.
धोत्रा भनगोजी येथील खूनप्रकरणी अमडापूर पोलिसात दाखल फिर्यादीवरून सर्व बाबींचा उलगडा झाला आहे. उत्रादा शिवारातील गट क्र. ५५ मधील ८८ आर जमिनीबाबत जनार्धन तुकाराम जोशी व पुतण्या समाधान उत्तम जोशी यांचा वाद होता. याच शेतात समाधान उत्तम जोशी हा सागर समाधान जोशी व संजय श्रीकृष्ण इंगळे यांच्यासमवेत ट्रॅक्टर घेऊन गेला होता व जबरदस्तीने शेतात वखरणी करीत होता. त्यास जनार्धन जोशी यांनी ‘शेत वखरू नका, हे शेत माझे आहे असे बोलत केल्याने समाधान जोशी व सागर जोशी या दोघांनी शिवीगाळ केली तर तिसरा आरोपी संजय इंगळे याने ‘कोणीही मध्ये आले तरी वखरून घे’ म्हणत चिथावणी दिली. तरीही जनार्धन तुकाराम जोशी बधला नसल्याने तिन्ही आरोपींनी संगनमताने जनार्धन जोशींच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांचा खून केल्याची फिर्याद मृताचा मुलगा सुधीर जोशी याने पोलिसांत दिली आहे. यावरून पोलिसांनी खून केल्याप्रकरणी तथा अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील, पीएसआय धनंजय इंगळे यांनी भेट दिली आहे. दरम्यान, प्रकरणातील आरोपी समाधान उत्तम जोशी व सागर समाधान जोशी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिसरा आरोपी संजय श्रीकृष्ण इंगळे फरार आहे