जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा २२ वर्षांचा बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळ संपवत सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा विक्रम करणारे खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपाने बुलढाणा जिल्ह्याला केंद्रात आतापर्यंतचे तिसरे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. दरम्यान, मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून ते पहिलेच केंद्रीय राज्यमंत्री ठरले आहेत. १८ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये सलग चौथा विजय मिळवत त्यांनी एक विक्रम आधीच केला होता. आता जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणूनही केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळविणारे ते एकमेव आहेत. आपल्या ३९ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड मिळवली आहे. दरम्यान, निकालानंतर मुंबईमध्ये जाऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत दिल्ली गाठली होती. दुसरीकडे त्यांच्याशिवाय मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये अनेक जणांची नावे होती. परंतु त्यांची ज्येष्ठता, सलग चार वेळा निवडून येणे आणि १९९५ च्या युती शासनाच्या काळात पाटबंधारे राज्यमंत्रिपदाचा सोबतच सलग चार ग्रामविकास व पंचायतराज समितीचे अध्यक्ष तथा संवाद व माहिती तंत्रज्ञान समितीचे एक वर्ष अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले असल्याने मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये त्यांचे पारडे जड ठरले आणि केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले, या व्यतिरिक्त राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, भाजपाच्या नेत्यांशी असलेले त्यांचे चांगले संबंध तसेच शिवसेनेतील उठावादरम्यान एकनाथ शिंदेसाठी त्यांनी केलेली खासदारांची जुळवाजुळव ही त्यांच्यासाठी पूरक ठरली. विशेष म्हणजे बुलढाण्यातून त्यांनी उद्धवसेनेच्या प्रा. नरेंद्र खेडेकर यांचाही पराभव केला आहे. त्यामुळे शिंदेसेनेचे सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.