मायक्रोफायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्यांना लुटले
गिरडा घाटात दीड लाख केले लंपास
बुलढाणाः- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- येथील मायक्रोफायनान्सच्या धनिक वसुली कर्मचाऱ्यांना गिरडा घाटात दरोडेखोरांनी मारहाण करत त्यांच्याकडील दीड लाख रुपये पळविले. ही घटना १० जूनच्या रात्री गिरडा गावापासून सुमारे सात किमी अंतरावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फर्दापूर पोलिस ठाण्यातंर्गत घडली.पंजाब थिगळे, धीरज शांतम आणि संघानंद इंगळे हे धनिक मायक्रोफायनान्सचे कर्मचारी १० जून रोजी सोयगाव तालुक्यात कर्ज वसुलीसाठी गेले होते. रात्री बुलडाणा येथे परत येत असताना त्यांना उशीर झाला. हे तिघे दोन दुचाकीने येत होते. दरम्यान टिटवी येथून काही जणांकडील कर्ज वसुली करून ते गिरडा घाट चढून वर येत असतांना महादेव मंदिराजवळ पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. लोखंडी रॉडने त्यांनी हा हल्लाचढवला होता. त्यात धीरज शांतम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाण्यात उपचार सुरू आहेत. कर्जवसुली केलेल्या पैशाची बाग पंजाब थिगळे कडे होती. चोरट्यांच्या तावडीतून ते कसेबसे निसटले परंतू चोरट्यांनी लगतच्या जंगलातही त्यांचा पाठलाग करत पैसे व मोबाईल हिसकावला. नंतर या प्रकाराची माहिती थिगळे यांनी पिंपळवाडी येथील स्थानिकांच्या मदतीने वरिष्ठांना आणि बुलढाणा पोलिसांनाही देण्यात आली. मात्र घटनास्थळ हे सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. तेथे नंतर तक्रार देण्यात आली.