गुणकारी जांभूल खातय भाव
दर्जेदार जांबूला २४० रुपये किलो भाव नागरिकांची मागणी कायम
लोणार- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या प्रसिद्ध गाण्याचे शब्द कानावर पडले तरी जीभ आपोआप ओली होते. गाण्यातील सहज कानावर पडणारे शब्द बाजारात मात्र चांगलेच वधारले आहेत. आंबट-गोड चव देणाऱ्या या रानमेव्याने यंदा मोठा भाव खाल्ला आहे. यंदा जांभूळ २०० ते २४० किलो रुपये दराने बाजारात विकले जात आहे. दर जादा असले तरी नागरिक जांभळे खरेदी करताना दिसत आहेत.
पावसाळ्यात सर्वांच्या आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या व सद्या दुर्मिल होत असलेल्या जांभळाला जास्त मागणी आहे. वर्षाऋतूत जांभूळ महत्त्वाचं फळ मानले जाते. गोल, लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट गोड व रसरशीत असतात. लोणार शहर व परिसरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात जांभळे विक्रीसाठी आली आहेत. लहान व मोठ्या आकाराची जांभळे ग्राहकांचे आकर्षण ठरू लागली आहेत. मोठी जांभळे २०० ते २४० रुपये किलो दराने विकली जात आहेत. तर लहान जांभळे मापावर विकली जात आहेत. जांभळाचे दर तेजीत असले तरी नागरिकांचा खरेदीसाठी ओढा वाढला आहे. पाऊस वाढेल तसतशी या फळाची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या फळाचा कालावधी दोन ते अडीच महिन्यांचा असतो. सध्या शहर व परिसरातील गल्ली बोळातून ‘जांभळे घ्या जांभळे’, अशी आरोळी कानी पडताच नागरिकांना जांभूळ खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे जांभळाचे आरोग्यदायी फायदे असल्याने त्याला चांगली मागणी आहे.
जांभळाचे आरोग्यदायी फायदे…
मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक आजारांवर हे फळ फायदेशीर आहे. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. सुगंधी पाने आणि गुणकारी बीज, फळे, फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधने तयार करताना केला जात होता. जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४.६ टक्क्यांनी कमी होतो. जांभळामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असतात. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा घ्या. त्वचेसंबंधीचे आजार असल्यास जांभळाचा ज्यूस करुन प्यायल्यास त्वचेसाठी गुणकारी ठरते. जांभळात मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असल्यामुळे हृदयविकारावर जांभूळ फायदेशीर ठरते.