दारूड्यांची बाजार समिती कर्मचाऱ्याला मारहाण
खामगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्याला दोघांनी दारूच्या नशेत मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान टीएमसी मार्केट यार्डमध्ये घडली.
तक्रारीनुसार, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी गजानन नामदेव वाथे (३६) बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बाजार समिती आवारातील पाण्याचा हौद व बाजार समितीची पाहणी करीत होते. त्यांना अक्षय बहुनिया आणि हवेलिया यांचा मुलगा (२४, दोघे रा. बाळापूर फैल) हे दोघे परिसरात मद्यपान करताना आढळून आले. त्यावेळी त्यांना हटकले असता अक्षय बहुनिया याने वाथे यांच्या डाव्या हातावर लोखंडी सळई मारून त्यांना जखमी केले. सोबतच शिवीगाळ करून मारहाण केली.
यावेळी मध्यस्थी करण्यास आलेल्या वैभव समाधान बनसोड यालासुद्धा अक्षय बहुनिया आणि हवेलिया दोघांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणला. यावेळी झालेल्या झटापटीत वैभव बनसोड यांचा मोबाइल पडला. हा मोबाइल कुणीतरी उचलून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीवरून खामगाव पोलिसांनी अक्षय बहुनिया आणि हवेलिया या दोन आरोपीविरुद्ध संगनमत करून बाजार समिती कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत जिवेमारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तथा लोखंडी सळई मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखला केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेब कुरेशी हे करीत आहेत.