दगडाने ठेचून धरणगावात 21 वर्षीय युवकाची हत्या
अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयित तिघांना घेतले ताब्यात
मलकापूर : -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील धरणगावात २१ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास काही जण शौचास जात असताना गावातील खंडोबा मंदिरानजीक खुल्या सभागृहात त्यांना रक्ताचा सडा दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर आदींसह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात रक्ताचा सडा व दक्षिणेस युवकाचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या खिशातील मोबाइलवरून संपर्क करण्यात आल्याने त्याची ओळख पटली. त्यानुसार त्याचे नाव दीपक सुधाकर सोनोने (२१, रा. डिडोळा, ता. मोताळा), असे आहे. या घटनेत मृतकावर दगडाने किंवा काठीने जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसून आले.त्याचबरोबर मंदिरानजीकच्या सभागृहात उत्तरेकडून दक्षिणेकडे तब्बल ३० फूट मारेकऱ्यांनी मृतदेह फरफटत नेल्याने रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले.
घटनास्थळी श्वान पथक पाचारण
त्या युवकाची हत्या आपल्या गावात कशी? या प्रश्नामुळे धरणगावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ स्थानिक तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. बुलढाणा येथील श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.याप्रकरणी मृतकाचा भाऊ, विजय सुधाकर सोनोने यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यात त्याचा भाऊ दीपक हा गुरुवारी सायंकाळी घरून निघून गेला होता. त्याचा मलकापुरात जग्गू मामाच्या ढाब्यावर शोध घेतला असता अनोळखी व्यक्तीने त्यांना माहिती दिली. त्याअनुषंगाने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.