येरे येरे पावसा ये पण लवकर…
जिल्ह्यात या तारखेपासून बरसणार जलधारा!
बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – ‘काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ..’ हे गीत सध्या पेरणीकडे डोळे लागलेल्या शेतकऱ्यांना आठवत असेल.. मात्र चिंता करू नका. भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. १८,२०,२१ जून रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दि.१९ जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर दि.२२ जून रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.तसेच या पाच दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे व दि. १८ ते २० जून दरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
▪️ शेतकऱ्यांनो काळजी घ्या..
जिल्ह्यात आजपर्यंत काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे, परंतु सार्वत्रिक पाऊस अद्याप झालेला नाही. म्हणून सध्याची हवामान परिस्थिती व पाऊसमान लक्षात घेता शेतकरी बंधूनी पेरणीची घाई करू नये. जमिनीतील उपयुक्त ओलावा व पेरणीयोग्य पाऊस (७५-१००मिमी)या दोन्ही बाबींची खात्री करून पेरणी करावी. खरीप पिकांच्या पेरणीसाठी वाणांची निवड करताना जमिनीचा प्रकार, आपल्या भागातील हवामान, पाण्याची उपलब्धता, वाणांची वैशिष्ट्ये व त्या वाणांची बाजारपेठेतील उपलब्धता या सर्व बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी स्वतःची व आपापल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी.विजांच्या पुर्वसुचनेसाठी दामिनी या मोबाईल अॅपचा वापर करावा असे आवाहन श्री.यदुलवार जिल्हा कृषी हवामान केंद्र,कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाडॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला यांनी केले आहे.