धाड येथील नवीन बियर बारची परवानगी रद्द करण्याची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून परवाना मिळवून दिल्याचा आरोप
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा तालुक्यातील धाड येथे नवीन बियर बारला शेजाऱ्याची हरकत तसेच गावात नवीन परवाने ना देण्याचा ग्राम पंचायतीचा ठराव असतांना देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून परवाना मिळवून दिल्याचा खळबळजनक आरोप धाड येथील सै.साबीर सै.अली यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटिल यांना 18 जुनला दुपारी 3 वाजता दिलेल्या निवेदनात करत तात्काळ सदर परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारकर्ता सै.साबीर सै.अली यांनी निवेदनात नमुद केले आहे की,मौजे धाड येथील गट नंबर 12 मध्ये त्यांच्या सामायिक भूखंडाला लागून त्याच गटात रामचंद्र खांडवे यांच्या जागेत नवीन बियर बार सुरू होणार आहे. त्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांचा बयान नोंदविण्यात आला.या बयानात त्यांनी बियर बारला विरोध दर्शवलेला आहे.सदर प्रकरण अंतिम मंजूरीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खालील समितिकडे 6 जूनच्या बैठकीत ठेवण्यात आला व समितीच्या या सभेत सदर बियर बारला परवानगी दिल्याचे कळाले.या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून सदर बियर बारला परवानगी मिळवून घेतली आहे.तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन बियर बार चालकाकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे.सदर परवानगी तात्काळ रद्द करून न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.