बनावट नॉनक्रिमिलेअर देऊन तरुणाची केली फसवणूक
सदर प्रकार पोलिस भरतीदरम्यान उघड झाला
हिवरा आश्रम : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बनावट नॉनक्रिमिलेअर तयार करून फसवणूक करणाऱ्या एकाविरुद्ध मेहकरचे नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून १८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
मेहकर तहसीलअंतर्गत येणाऱ्या हिवरा आश्रम येथे सेतू केंद्रावर कामाला असणाऱ्या गजानन गोपाळा गोफणे (रा. शिवाजीनगर) या युवकाने १० मार्च २०२२ रोजी त्याच्याजवळ नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र बनवून घेण्यासाठी आलेल्या युवकाला बनावट नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र बनवून दिले. त्याप्रकरणी पडताळणी केल्यावर ते सर्टिफिकेट बनावट असल्याचे दिसून आल्याने गजानन गोफणे याच्याविरुद्ध मेहकर पोलिस स्टेशनला नायब तहसीलदार कौतिकराव रावळकर यांनी तक्रार दिली. त्यावरून फसवणुकीसह अन्य कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मेहकर तहसीलअंतर्गत येणाऱ्या एका गावातील युवकाची पोलिस भरतीमध्ये निवड झाली होती. हा युवक पोलिस भरतीला पात्र ठरला. त्या युवकाचे कागदपत्र पडताळणीसाठी आले असता, त्यातील नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र ऑनलाइन पडताळणी केली असता, ते प्रमाणपत्र कुठेच दिसत नव्हते.त्या युवकांच्या कागदपत्राची पडताळणी ही मेहकर तहसीलकडून होत असताना कोठे कागदपत्र तयार केले, याची विचारपूस केली असता, नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट बनवून घेणाऱ्या युवकांनी संबंधित गजानन गोफणे याचे नाव घेतले. गजानन गोफणे याने सुद्धा कबूल केले की बनावट सर्टिफिकेट बनवून दिले. ज्यावर टाकण्यात आलेला नंबर हा एका अंकाने कमी असल्याने तो कोठेच ट्रेस होत नव्हता. साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थळ असल्याने गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला आहे.