महिला शेतकरी युवकांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा ः आ. डॉ. संजय कुटे

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-महायुती शासनाने महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेमार्फत महिलांच्या खात्यात दर महिन्याला दिड हजार रुपये जमा होणार या योजनेतील काही अटी रद्द करून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. एसटी महामंडळामार्फत सुरु असलेल्या महिलांच्या अर्धे भाडे योजनेचा लाभ दररोज हजारो महिला घेत आहेत. शेतकर्यांसाठी सौर योजना माफक दरात करण्यात आली आहे. युवकांना रोजगार उद्योग निर्मितीसाठी सबसीडीवर कर्ज उपलब्ध करून देण्यासोबतच महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप नेते आ. डॉ. संजय कुटे यांनी केले आहे.
येथील पत्रकार भवन येथे दि. 5 जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेश्वर उबरहंडे, सिद्धार्थ शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष विजया राठी, महिला आघाडीच्या रंजना पवार, अॅड. किरण राठोड, बाळासाहेब गिर्हे उपस्थित होते.
आ. डॉ. संजय कुटे यांनी राज्य शासनाने अर्थसंकल्पात महिला शेतकरी युवकांसाठी लाभदायी योजना मंजूर केल्या असून संपूर्ण राज्यात लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत भगिनींना मोठी अडचण निर्माण झाली होती. लहान मोठ्या कागदपत्रांसाठी त्यांची दमछाक झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या अटींमध्ये योग्य ते बदल घडविले. काही अटी शिथील केल्या. यामुळे राज्यभरातील भगिनींना सोयीचे झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकाराला वर्षाला 46 हजार कोटी रुपये लागणार असल्याचे सांगून पात्र ठरणार्या प्रत्येक महिलांपर्यंत ही योजना पोहोचवल्या जाणार आहे. या योजनेशिवाय राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात युवक, शेतकरी, महिला यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प लोककल्याणकारी ठरणार आहे. महिलांना एसटी महामंडळ मध्ये 50 टक्के सवलत दिली आता एसटी महामंडळ तोट्याकडून नफ्याकडे प्रवेश करीत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत 4 हजार कोटी रुपयांचा विमा वितरित झाला असून आता आणखी 3 हजार कोटी रुपयांचा विमा शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे ते म्हणाले. 10 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण कालावधीत दहा हजार रुपये प्रति महिना अनुदान देण्याचा निर्णयदेखील राज्य शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. महिलांचे बचत गट सुरू झाल्यानंतर आधी 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळायचे आता त्यात आणखी 15 हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून खेळते भांडवल म्हणून आता 30 हजार रुपये मिळणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी तालुका केंद्रावर विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सिंचनाच्या माध्यमातून शेतकर्यांना समृद्ध करत शाश्वत शेती करता यावी विजपुरवठ्यासाठी लागणारा अतिरीक्त विजबिलाचा भार कमी करण्यासाठी यासाठी सुद्धा राज्य शासन प्रयत्नशील असेही डॉ.संजय कुटे यांनी आर्वजून सांगितले.