कृष्णाच्या त्या मारेकरांना फाशीची शिक्षा द्या!
आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा शेगाव बार असोसिएशनचा ठराव!

शेगाव (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) निरागस कृष्णाचा निर्दयपणे खून करण्यात आला. खून करणाऱ्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी उठत आहे. दरम्यान आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव शेगाव बार असोसिएशनने घेतला आहे.
बेपत्ता असलेल्या कृष्णा कराळे या विद्यार्थ्यांचा खून झुल्या नंतर शुक्रवारी नागझरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या दोन्ही आरोपींना 30 जुलैपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात आली आहे. या संदर्भात शेगावच्या वकील संघाने भूमिका घेत शेगाव वकील संघातील कोणतेही वकील सदस्य त्यांचे वकीलपत्र आरोपीच्या वतीने दाखल करणार नाहीत. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आरोपीला मदत करणार नाहीत, असा ठराव करीत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.कृष्णाचे अपहरण करून निर्दयपणे खून करण्याचा प्रकार निंदनीय आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना धडा शिकविण्यासाठी शेगाव वकील संघाने या प्रकरणामध्ये शेगाव वकील संघातील कोणतेही वकील सदस्य त्यांचे वकीलपत्र आरोपीच्या वतीने दाखल करणार नाहीत. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आरोपीला मदत करणार नाहीत, असा ठराव घेऊन या गुन्ह्याचा निषेध म्हणून वकील संघाने प्रखर भूमिका घेतली. प्रकरणाचा तपास शीघ्र गतीने करून विशेष सरकारी वकील अॅड, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांचेमार्फत पाठविलेल्या निवेदनात केली असल्याचे शेगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कैलास गुप्ते यांनी सांगितले.