वायनाडच्या मदतीला महाराष्ट्र कन्येचा हात मेजर सीता शेळकेंच्या पाथकाने ३१ तासात १९० फूट लांबीचा पूल बांधून केले अभिमानास्पद कार्य…

मलकापूर :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे :- दि. ३० जुलैच्या रात्री केरळच्या वायनाडमध्ये पावसाने हाहाःकार केला. दरड कोसळून गावं आणि गावकरी ढिगाऱ्याखाली आले. २०० हून अधिक मृत्यू तर २५० हून अधिक लोक बेपत्ता झाले. चुराल्लमाला ते मुंदाक्काई या दोन गावांना जोडणारा ब्रिटीशकालीन पूल या भयंकर पावसाने वाहून गेला होता.
निसर्गाने रौद्ररूप धारण केले. निसर्गासमोर माणसाला त्याच्या क्षुद्र अस्तित्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. चुराल्लमाला, मुंदाक्काई आणि मेप्पडी ही गावं वायनाड जिल्ह्यात आहेत. डोंगररांगांतून निघणारा पाण्याचा प्रवाह चुराल्लमालामधून पुढं सरकत इरुवंचीपुळा नदीला जाऊन मिळतो. ३० जुलै व काही दिवस आधी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली. या नदीने मुंदाक्काई हे गावच गिळंकृत केले. याच गावाला सर्वांत आधी भूस्खलनाचा फटका बसला.दुर्घटनेनंतरची स्थिती अधिक भीषण असते. सर्वस्व हरपलेले नागरिक सैरावैरा पळत आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. आपल्याला संकटातून वाचवणारा तारणहार यावा, यासाठी प्रार्थना करत होते. तातडीने मदतकार्य तर सुरू करण्यात आले. पण मदतकार्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता. चुराल्लमाला ते मुंदाक्काई दरम्यान असलेला पूल पावसात वाहून गेला होता. पूलच नसल्यामुळे मदतकार्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि मदत साहित्य नेणे शक्य होत नव्हते. याठिकाणी तातडीने एक पूल उभारणे गरजेचे होते. पण अशा परिस्थितीत ते कसे शक्य होणार?
पण म्हणतात ना, अशक्याच्या छाताडावर पाय रोवून जी उभी राहते, ती म्हणजे ‘शक्ती’, जिला आपण ‘स्त्री’ म्हणून संबोधतो. लष्कराच्या जवानांनी याठिकाणी बेली ब्रिज (तात्पुरता लोखंडी पूल) उभारला. पुलाच्या उभारणीची जबाबदारी असलेल्या तुकडीचं नेतृत्व करत होत्या, मराठी लष्करी अधिकारी मेजर सीता शेळके! मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या असलेल्या सीता शेळके यांच्या देखरेखीत सैन्य दलाच्या पथकाद्वारे बेली ब्रिजचे बांधकाम ३१ तासांच्या अथक प्रयत्नाने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले. मेजर शेळके या त्यांच्या पथकातील एकमेव महिला अधिकारी असून त्यांनी बजावलेल्या या कामगिरीमुळे आज अनेक प्राण वाचले आहेत. सीता शेळके या बचावकार्यात निष्णात असून त्यांच्या पथकाकडून यापूर्वीही अशा कामगिरी करण्यात आल्या आहेत.
मेजर सीता शेळके आज अनेकांच्या, विशेषतः महिलांच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांच्या असामान्य धैर्य, शौर्य व कार्याला सलाम!