जिद्द , चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर अशा अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये त्या युवकाने घेतली गरुड झेप
तांड्यावरचा मुलगा झाला गणित विषयामध्ये सेट पास.

लोणर : आपला बुलढाणा जिल्हा बातमी (लखन जाधव) गुरुकृपा उच्च माध्यमिक आश्रम शाळा साडेगाव, ता.जि. परभणी, येथे उच्च माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले, बिबखेड या गावचे सुपुत्र श्री पवनकुमार जाधव सर हे महाराष्ट्र शासनाची अतिशय अवघड समजली जाणारी (सेट) परीक्षा गणित विषयात उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे, आपल्या गावातून अतिशय हालाखीच्या परिस्थितीमधून आपल्या जिद्द , चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर अशा अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये पात्र होण्याचा बहुमान तू मिळवलास त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आम्हाला सार्थ अभिमान आहे तुझ्यावर असे गौरवोद्वार गावकऱ्यांच्या मुखातून निघत आहे. आज श्री जाधव सर जेथे कार्यरत आहेत तेथील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री होळे सर व सर्व सहकारी वृंद यांच्या वतीने महाविद्यालयामध्ये सरांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री जाधव सरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की माझ्या कुटुंबात शैक्षणिक पार्श्वभूमीचा लवलेशही नव्हता माझे आई-वडील दोन्हीही अशिक्षित. सध्या माझ्या दुर्दैवाने माझे वडील ह्यात नाहीत. पण माझ्या प्रत्येक निर्णयांमध्ये ते माझ्यासोबत असत. शिक्षणाबाबत मनात मोठी आशा असायची पण परिस्थिती पुढे काहीही चालायचे नाही. मात्र तीव्र इच्छाशक्ती पुढे पाषाणालाही पाझर फूटतो असेच काही माझ्यासोबत घडत गेले. ज्या अतिशय प्रखड परिस्थिती मधून, आपण घेतलेले शिक्षण किती कष्टदायी होते यावर भाष्य करत असताना उपस्थित विद्यार्थी व इतर कर्मचारी यांच्या मनाचा ठाव घेणारे मनोगत सरांच्या अनुभवातून व्यक्त होत गेले,अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सतत प्रयत्न करीत राहिल्यास यशाला गवसणी घालता येते. हे सरांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. सरांनी आपल्या या यशाचे सर्व श्रेय आपले आई-वडील,आजी, गुरुजन वर्ग आणि कठीण काळामध्ये सदैव सोबत असणाऱ्या सर्व सहकारी मित्रांना दिले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक श्री वाघमारे सर यांनी केले व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.