बुलढाणा येथे जयभीम एकता परिषदेचे आयोजन
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचे आवाहन

बुलढाणा :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- बुलढाणा येथील गोलांडे लॉन चिखली रोड बुलढाणा या ठिकाणी ११ ऑगस्ट २०२४ रोजी भीम आर्मी बुलढाणाच्या वतीने ‘जयभीम एकता परिषदेचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेमध्ये देशभर सुरू असलेल्या संविधान विरोधी घडामोडीवर चर्चा करण्यात येणार असुन यामध्ये अनुसूचित जाती व जमाती संदर्भातील माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला घटनाबाह्य निर्णय, राजकीय परिवर्तन काळाची गरज समस्या व उपाय, आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती मधील दशा आणि दिशा, बौद्ध समुदायाचे राजकीय अवमुल्यांकन व बौद्ध संस्कृतीचा ऱ्हास, राजकीय नेतृत्व आणि समाजातील वैचारिक वर्ग यांच्यामध्ये समन्वय असणे काळाची गरज, तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षा व सहकार या संदर्भात स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे इत्यादी विषयांचा समावेश प्रामुख्याने करण्यात आलेला आहे. सदर परिषदेमध्ये भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव भाई अशोक कांबळे व सुनील गायकवाड उपस्थित राहणार असून जिल्हाभरातील साहित्यिक, विचारवंत, सेवावृत्त कर्मचारी व कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे. या परिषदेदरम्यान होणारी चर्चा व आलेल्या सूचना यांची नियमावली बनवून त्यावर समाजाला अपेक्षित काम करण्याचा संकल्प भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केला आहे.