राजर्षी शाहू मल्टिस्टेटची सर्वसाधारण सभा ठरली अभिनव!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):- गेली २२ वर्षे सहकारात काम करतांना आपण शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक यासह तळागाळातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी चांगले काम करता आल्याचे समाधान आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासणे हेच आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके यांनी केले.
राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील कोलवड येथील प्रियांका लॉन्समध्ये उत्साहात संपन्न झाली. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. मंचावर संदीप पाटील, गिरीश चांडक, डॉ. अशोक खरात, विजय महाजन, सुनील सोळंकी, ॲड. दत्तात्रय भुतेकर, नितीन जाधव, संदिप अग्रवाल, अभय जैन, अश्विन सातपुते, दीपक मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मिस कॉल सुविधेचे अनावरण झाले. भविष्यात व्हाट्सअप मोबाईल बँकिंग सुविधा सुद्धा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सभासदांना लाभांश वाटपाची घोषणा झाल्यानंतर व्हाईस कॉलच्या माध्यमातून सभासदांच्या खात्यात लाभांश जमा करण्यात आला. संस्थेच्या आर्थिक बाजू व ठराव डिजिटल पद्धतीने स्क्रिनवर दाखवण्यात आल्याने ही सर्वसाधारण सभा अभिनव ठरली. स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला कौतिकराव जाधव, सास्ते महाराज, ज्ञानेश्वर महाराज शेलूदकर, गणेशसिंग राजपूत, शिवाजी तायडे, डॉ.शरद काळे, सीताराम पाटील, संचालक प्रा. पांडुरंग सवडतकर, राम लोखंडे, दीपक गायकवाड, श्याम पाटील सावळे, पृथ्वीराज राजपूत, छाया शेळके, सुनंदा शेळके, स्वाती रावत, तज्ञ संचालक ऍड. श्रीकृष्ण कोल्हे यांच्यासह सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, मुंबई, नाशिक व राज्यभरातील सभासद, खातेदार उपस्थित होते. संचलन गोविंद येवले यांनी केले तर आभार नितीन उबाळे यांनी मानले.
ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार- संदीप शेळके
भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देऊन ग्राहकांना तत्पर सेवा देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने काही सुविधांचा प्रारंभ सुद्धा करण्यात आला. विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यास आपले प्राध्यान्य आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणे काळाची गरज असून त्यासाठी राजर्षी शाहू मल्टिस्टेट सातत्याने प्रयत्न करीत आहे. अर्थव्यवस्था सुधारल्यास तरुणाईस नोकरीसाठी महानगरांमध्ये जावे लागणार नाही, असे प्रतिपादन राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.
महिलांमध्ये संधीचे सोने करण्याची क्षमता- मालती शेळके
महिलांमध्ये संधीचे सोने करण्याची क्षमता असते. पाठबळ, मार्गदर्शन, समान संधी मिळाल्यास महिला आपली क्षमता सिद्ध करु शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिला पाहिल्यानंतर त्याचा प्रत्यय येतो. कुटुंबातून मला खंबीर साथ मिळाल्यामुळे मी संस्थेचे कामकाज यशस्वीपणे सांभाळू शकले. प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील महिलांना पाठबळ द्यावे, असे आवाहन राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या संस्थाध्यक्षा मालती शेळके यांनी केले.