मंजूर झालेल्या बायपासचे काम त्वरित सुरू कराः वंचित आघाडीची मागणी

लोणार: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- (लखन जाधव):- शहरालगत मंजूर झालेल्या बायपासचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आज, दि. २८ ऑगस्ट रोजी निवेदन दिले. त्यामध्ये नमूद केले आहे की, शहरासाठी २००८ पासून बायपास मंजूर असून तो निधीअभावी प्रलंबित आहे. शहरातून जाणारा रस्ता हा बस स्थानकासमोरून जात असून लोणार तालुक्याला लागून जालना, परभणी, वाशीम अशा सीमा आहेत. पूर्णा नदी लोणारच्या जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होते. तसेच शहरातून जाणारा रस्ता अरुंद असून दोन वाहनेही जाऊ शकत नाहीत. मात्र, लोणार बायपास हा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असून, निधी नसल्याचे सांगितले जाते. लोणार सरोवर विकास आराखड्याअंतर्गत अभयारण्यातील प्राणी वाचविण्यासाठी ७० कोटींचा निधी प्राप्त झाला असून काम सुरू आहे. मात्र, त्या रस्त्याचा नागरिकांसाठी काहीही उपयोग नाही. त्यामुळे २००८ पासून मंजूर झालेल्या बायपासचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन देताना महेंद्र मोरे, सुनिल इंगळे, प्रशिस इंगळे, आचित पाटोळे, कैलास मोरे, विजय शेजूळ, मुरलीधर मोरे, जावेद खान, मधुकर वाणी उपस्थित होते.