‘ही समिंदराची लाटं, देवा पाहते तुमची वाटं…!’
आज देवबाप्पांना भाव मनोभावे निरोप!

बुलढाणा(आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) ‘पुढच्या वर्षी लवकर या!’ असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप देण्याची आज वेळ आली आहे.दरम्यान सार्वजनिक मंडळ व घराघरातील बाप्पाचे विसर्जन पाण्यात करण्यात येत असल्याने भाविकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने व शांततेपूर्वक गणेश विसर्जन करावे असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे.
दरवर्षी अनेक ठिकाणी विसर्जनाप्रसंगी भक्तांचा पाण्यात बुडून दुःखद घटना घडतात. त्या होऊ नये म्हणून गणेशभक्तांनी काही काळजी घेणे आवश्यक आहे.दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा होतो. यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय. गणेश मंडळांनी आता जुन्या पद्धती सोडून नवनवीन उपक्रमांची कास धरली आहे. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रीडा स्पर्धा व जनजागरण कार्यक्रमांवर भर दिला आहे. यंदा निसर्गानेसुद्धा भरभरून प्रतिसाद दिला असून सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वच ठिकाणचे जलस्रोत तुडुंब भरले आहेत.
दरम्यान, सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती स्थापनेपासून ते विविध उपक्रमांसह बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक व कुठे विसर्जन करायचे याचे संपूर्ण नियोजन केले आहे.आता बाप्पांच्या विसर्जनाची वेळ आली आहे.आज गणरायांना मनोभावे निरोप देण्यात येणार आहे. मूर्ती विसर्जन करताना बाप्पाची मनोभावे पूजा-आरती झाल्यावर विसर्जन करण्यासाठी घाई केली जाते व अशावेळी अति उत्साहाच्या भरात आड, विहीर, बारव, डोह, खदान, बंधारा, नदी, तलाव, सरोवर, तळे किंवा आता पावसामुळे मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामध्ये गणरायाचे विसर्जन करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
▪️अशी घ्या काळजी!
बाप्पाचे विसर्जन प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच करावे.,निर्माल्य संकलन केंद्रावरच जमा करावे.वाहत्या पाण्यात जाऊ नये.अति धाडस करू नये.नैसर्गिक अपरिचित जलस्रोताजवळ जाऊ नये. , चिखलात पाय फसण्याची दाट शक्यता असते.,पाण्यात गेल्यावर एकमेकांवर गुलाल उधळू नये.मोजक्या व अनुभवी मंडळींनीच गणपती विसर्जन करावे.पोहता येत असेल तरच पाण्यात जावे.
विसर्जनाच्या वेळी एकमेकाला धक्काबुक्की करू नये. विसर्जन झाल्यावर मूर्ती पूर्णपणे बुडायलाच हवी असा अट्टहास करू नये. गणेशोत्सवाचा शेवटही आनंददायी व सुखरूप व्हावा म्हणून भक्तांनी योग्य अशी काळजी घ्यावी. शांततेने विसर्जन करावे,असे आवाहन दक्ष युवा समाजसेवी तथा बुलढाणा शहरचे मानससेवी विशेष पोलीस अधिकारी श्री प्रभाकर वाघमारे यांनी केले.