एकीकडे वरूण राजाचा प्रकोप तर दसरा मेळाव्यातून नेत्यांचे आरोप- प्रत्यारोप!
ॲड.जयश्री शेळके शेतकऱ्यांच्या बांधावर !

मोताळा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- रात्री वरूणराजा गरजलाच नाही तर बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात ताकतीने बरसला..ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके बुडाली तर अनेकांच्या शेतातील विहिरी खचल्या..अनेकांच्या घरात पाणी शिरले एकुणच पावसाने रात्रीच सीमोल्लंघन करून अनेक ठिकाणी थैमान घातले.दुसरीकडे दसरा मेळाव्यातून नेत्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप – प्रत्यारोपाचे ‘बाण’ सोडले आहे.दसरा मेळाव्यातील ठसकेबाज असं ऐकण्यात नेते – गुंग असताना, काँग्रेसच्या प्रदेश सचिव ॲड. जयश्रीताई शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामे व आर्थिक मदतीसाठी सरकारकडे मागणी रेटली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे काल रात्री बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात विविध ठिकाणी जोरदार परतीचा पाऊस झाला. पुन्हा पुन्हा या पावसाने डोळे वटारल्यामुळे पार दैना उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच्या ढगफुटी सदृश्य पावसाने तर कहरच केला. मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.अनेक शेतातील विहिरि खचल्यात.मका, सोयाबीन कापूस व तूर ही पिके पाण्याखाली गेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या दसरा सणावर तर विरजण पडलेच शिवाय पंधरा दिवसावर येऊन ठेपलेली दिवाळी देखील पीक नुकसानीमुळे अंधारात जाण्याची भीती बळावली आहे. लोकप्रतिनिधी व पक्ष नेते मात्र आज दसरा मेळाव्यातील वरिष्ठ नेत्यांच्या भाषणाकडे लक्ष लावून आहेत. त्यांची भाषणे चवीने ऐकली जात आहेत. परंतू शेती पिकांच्या नुकसानेकडे अनेकांनी पाठ फिरवल्याची दिसून येत आहे.एरवी ते शेतकऱ्यांचा पुळका आणून आश्वासनांची खैरात करीत असतात परंतू आज शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काही प्रामाणिक नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याचे दिसले.त्यापैकी पहिले नाव म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके आहे. त्यांनी मोताळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी सरकार कडे केली आहे.