देशी दारुची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पथकाची कारवाई
21 बॉक्ससह दोन आरोपी अटकेत

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- देशी दारुची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत गुरुवारी मोताळा ते नांदुरा दरम्यान विनापास परवाना अवैध देशी दारुची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह अटक करुन त्यांच्याकडून एकूण 1 लाख 23 हजार 590 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क खामगांवचे निरीक्षक व्हि.एम पाटील यांनी दिली आहे.
दिनांक 17 ॲाक्टोबर 2024 रोजी दुय्यम निरीक्षक, खामगाव -2 यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोताळा ते नांदुरा दरम्यान पवन एकनाथ तायडे या नावाचा इसम विनापास परवाना अवैध देशी दारुची वाहतूक करणार आहे. सदर बातमीनुसार कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता व बातमीची शहानिशा करण्याकरिता बातमीदाराने सांगितलेल्या ठिकाणी दुय्यम निरीक्षक, खामगाव-2 यांनी स्टाफ व पंचांसह जावून त्या ठिकाणी बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार सापळा रचून पाळत ठेवली असता पवन एकनाथ तायडे रा. शेंबा ता. मोताळा जि. बुलढाणा यास एका मोटार सायकलवरुन देशी दारुची अवैध वाहतूक करतांना पकडले. त्याचे ताब्यातुन मोटार सायकलसह देशी दारु टैंगो पंच 90 मिलीची 700 बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. मुद्देमालाची एकूण किंमत 74 हजार 590 रुपये आहे.सदर आरोपीकडून अधिक माहिती घेवून मौजे शेंबा येथील सागर भगवान भिडे याचे राहते घरी छापा टाकला असता आरोपीच्या राहते घरी देशी दारुच्या 90 मिलीचे 14 बॉक्स अवैधरित्या विक्रीसाठी बाळगून असता मिळून आला. त्याचे ताब्यातून एकूण 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात सहभागी अमोल भगवान भिडे मिळून आला नाही. आरोपींकडून गुन्ह्यात एकूण 1 लाख 23 हजार 590 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अमोल भगवान भिडे हा इसम फरार झाला आहे. सदर आरोपींविरुद्ध दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव-2 कडे महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत कलम 65 अ, ई व 83 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, विभागीय उप आयुक्त अर्जुन नाना ओहाळ जिल्हाधिकारी डॉ. श्री. किरण पाटील, अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांचे मार्गदर्शनाखाली श्निरीक्षक व्हि. एम. पाटील, निरीक्षक बोज्जावार, दुय्यम निरीक्षक दत्तात्रय कुटेमाटे, दुय्यम निरीक्षक माकोडे, दुय्यम निरीक्षक शिंदे, जवान अमोल सोळंके, परमेश्वर चव्हाण, शारदा घोगरे, नितीन सोळंकी, प्रमोद पिंपळे, मोहन जाधव, अमोल सुसरे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक दत्तात्रय कुटेमाटे, राज्य उत्पादन शुल्क करीत आहेत.