आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपली कला विकसित करावी !
रविकिरण टाकळकर त्यांची मार्गदर्शक सूचना !

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) मनुष्याचा संगीताशी संबंध हा गर्भावस्थेतील हृदयाच्या धडधड सुरु होण्या पासूनच सुरु होतो. प्रत्येकाला संगीतात कमी अधिक आवड ही असतेच. तेव्हा आपली ही आवड आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत विकसित करावी असे प्रतिपादन रविकिरण टाकळकर यांनी जनरल ओपन इलेक्टीव्ह अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित स्थानिक जिजामाता महाविद्यालयाच्या संगीत विभागाद्वारे आयोजित जनरल ओपन इलेक्टीव्ह अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा डॉ जे जे जाधव ,प्रमुख उपस्थिती रविकिरण टाकळकर तर आयक्युएसी समन्वयक प्रा डॉ सुबोध चिंचोले, संगित विभाग प्रमुख प्रा गजानन लोहटे, प्रा प्रिती आराख हे प्रमुख्याने उपस्थितीत होते.
नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून सुरू झालेली आहे. याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना प्रा डॉ जे जे जाधव म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनामुळे विज्ञान किंवा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना ओपन इलेक्टीव्ह अभ्यासक्रमा अंतर्गत कला शाखेतील संगिता सारखा विषय निवडुन आपली आवड जोपासने व विकसित करणे शक्य होणार असल्याने या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा . आयक्युएसी समन्वयक प्रा डॉ सुबोध चिंचोले यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना समायोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीत विभाग प्रमुख प्रा गजानन लोहटे यांनी केले . याप्रसंगी विद्यार्थ्यांना कराओके व महाराष्ट्रातील लोकगीत संगित प्रकार व तो आत्मसात करण्याची कौशल्य याबाबत माहिती दिली.तर संचालन कु रोशनी सोनवणे व वैष्णवी म्हलसने व कु. दिपाली टेकाळे यांनी तर आभारप्रदर्शन संगीत विभागाच्या प्रा प्रिती आराख यांनी केले. या कार्यक्रमाकरीता डॉ. एस. एन. गवई , डॉ एस एल कुंभारे, यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. अशोक भाऊ,श्रीमती भोंडे , भगवान उबाळे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमासाठी प्रा रामेश्र्वर बनकर व संगित विभागाचे नियमित विद्यार्थी तसेच ओपन इलेक्टीव्ह म्हणून संगीत विषयाची निवड केलेले विज्ञान व वाणिज्य शाखेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.