Homeबुलढाणा (घाटावर)

डॉ. शिवप्रसाद गोंधणे ठरू शकतात प्रबळ उमेदवार उद्धव ठाकरेंकडून उमेदवारीची प्रतीक्षा!

निष्ठावंत शिवसैनिक व भूमिपुत्रालाच उमेदवारी देण्याची मागणी ऐरणीवर!

Spread the love

मेहकर आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – विधानसभेच्या मेहकर-लोणार मतदारसंघातून या दोन तालुक्यांतील निष्ठावंत शिवसैनिक व प्रसिद्ध चर्मरोगतज्ज्ञ डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी मिळाली, तर ते प्रबळ उमेदवार ठरू शकतात. कारण, या मतदारसंघात बाहेरील उमेदवार कदापिही स्वीकारला जाणार नसून, स्थानिक भूमिपुत्रालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे यापूर्वीच केलेली आहे. डॉ. गोंधणे यांचा लोणार व मेहकर तालुक्यांत असलेला व्यापक जनसंपर्क, जनमाणसातील त्यांची प्रतिमा आणि विकासांचा दूरदृष्टीकोन, या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळापासून ते शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत.

 

जेष्ठ शिवसैनिक डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांनी मुंबई येथे जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे रितसर उमेदवारी मागितलेली आहे. पक्षाच्या प्रत्येक लढ्यात त्यांनी घेतलेला सक्रीय सहभाग, गेल्या ३६ वर्षांपासून कोणतेही पद न मागता, शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी एकनिष्ठपणे केलेले कार्य, आणि मेहकर-लोणार तालुक्यातील प्रसिद्ध व लोकप्रिय डॉक्टर म्हणून असलेली त्यांची ओळख, या त्यांच्या जमेच्या बाजू त्यांनी पक्षनेतृत्वापुढे मांडल्या आहेत. तद्वतच, या मतदारसंघाच्या विकासाचे त्यांचे ‘व्हिजन’देखील त्यांनी सक्षमपणे मांडले आहे. या मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर भूमिपुत्रालाच उमेदवारी द्यावी लागणार आहे. बाहेरच्या उमेदवारामुळे पक्षात गटबाजी निर्माण झालेली आहे. तर डॉ. गोंधणे हे पक्षातील सर्वांनाच चालणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह स्थानिक नेत्यांचा कोणताही विरोध असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच, मेहकर व लोणार तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी हेदेखील त्यांच्या प्रचारकार्यात स्वतः झोकून देऊन काम करतील, कारण डॉ. गोंधणे यांनी आतापर्यंत सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले असून, सर्वांच्या मदतीला ते धावून तर गेलेच; पण स्थानिक निवडणुकांत त्यांनी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मदतीचा हातदेखील दिलेला आहे.

मेहकर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, तो स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा आहे. या मतदारसंघात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारा मानणारा मोठा समाज आहे. या सर्व समाजाला डॉ. शिवप्रसाद गोंधणे हे चालणारे नेतृत्व आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉ. गोंधणे यांनाच उमेदवारी देऊन, जनमताचा यंदाचा स्पष्ट कौल पाहाता, डॉ. गोंधणे यांना संधी द्यावी, व या मतदारसंघात इतिहास घडवावा, अशी प्रतिक्रियादेखील जनमाणसातून उमटू लागल्या आहेत.

 

डॉ. गोंधणे यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठे मेळावेसुद्धा घेतलेले असून, ग्रामीण भागात, शहरात आणि वार्डावार्डामध्ये त्यांनी शिवसेनेच्या अनेक शाखादेखील उघडलेल्या आहेत. अनेकवेळा त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. परंतु प्रत्येकवेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही. ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली त्यांना तन, मन, धनाने साथ देऊन त्यांनी निवडून आणले आहे. त्यामुळे यंदा तरी त्यांच्या नावाचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी अपेक्षा जनमाणस व्यक्त करत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page