संदीप शेळकेंची सहकुटुंब आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी
कुंवरदेव येथे माता-भगिनींना साडी फराळाचे वाटप

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी सलग चवथ्या वर्षी आदिवासी बांधवांसोबत सहकुटुंब दिवाळी साजरी केली. जळगाव जामोद तालुक्यातील कुंवरदेव येथील माता-भगिनींना साडी- फराळाचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्याच्या सीमेवरील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल कुंवरदेव हे गाव राजर्षी शाहु मल्टिस्टेटने दत्तक घेतले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक दशके विकासापासून वंचित कुंवरदेव गावातील आदिवासी बंधू भगिनी चौफेर प्रगतीपासून दूरच राहिले. मात्र व्यवसायाला सामाजिक बांधिलकीची जोड देणारे संदीप शेळके आणि शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्ष मालती शेळके यांनी कुंवरदेव गाव दत्तक घेतले. त्यामुळे गावात प्रगतीचे वारे शिरले. त्यांनी विविध उपक्रम राबवून गावकऱ्यांना मदतीचा हात दिला. लहान बालकांना शिक्षणासाठी साहाय्य केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. दूरवरच्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. यामुळे त्यांची गैरसोय दुर झाली असून शिक्षणातील गोडी वाढली आहे. काही जण उच्च शिक्षणाकडे वळण्याची सुखद चिन्हे आहेत.
दरवर्षी शेळके दाम्पत्य कुंवरदेव गावातच दिवाळी साजरी करतात. यावर्षी सुद्धा ते आपल्या सहकाऱ्यांसह गावात दाखल झाले. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आदिवासी माता भगिनींना साडी, चोळी, मिष्टान्न, कपड्यांचे वाटप केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद बघून मनाला खूप समाधान वाटले. “आमचा भाऊ भेटीला आला…मनोमनी आनंद झाला” म्हणत माता-भगिनींनी औक्षण केले. दिवाळी हा आनंदाचा सण. इतरांना आनंद वाटून दिवाळी साजरी केल्यास खऱ्या अर्थाने मनाला समाधान मिळते, असे शिवसेना (उबाठा) चे जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके म्हणाले. राजर्षी शाहू परिवाराने आदिवासीबहुल कुंवरदेव गाव दत्तक घेतले आहे. याठिकाणी आपणास विकासाची गंगा पोहचवयाची आहे. इथली साधी माणसं जगाच्या झगमगाटपासून कोसोदूर आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केल्याने आनंद द्विगुणित झाला, असे राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके म्हणाल्या.
या कौटुंबिक कार्यक्रमाला सरपंच जुलामसिंह, अंगणवाडी सेविका जिजलबाई चव्हाण, छाया शेळके, मनोज वाघ, रमेश ताडे, भीमराव पाटील, वसंता इंगळे, शैलेश काकडे, संजय लोखंडे, शरद मोहिते, रवी काकडे, गणेशसिंग राजपूत, पृथ्वी राजपूत, दिलीप चव्हाण, प्रीती सावळे,सतीश बहुरुपी, नूतन वाघ आदी उपस्थित होते.