निवडणुकीच्या दरम्यान १.३० कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

बुलढाणाः आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:जिल्ह्यातील मलकापूर, चिखली आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हे खर्चाच्या बाबतीत संवेदनशील असतानाच जिल्ह्यात निवडणूक काळात मद्य पुरविण्याचा पॅटर्न पाहता पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात मद्यासह, शस्त्र, रोख रक्कम, गुटखा असे मिळून तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त कण्यात आला आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून अवैध मद्यविक्री व वाहतक प्रकरणी ६८६ प्रकरणात कारवाई करण्यात आली तर पाच तलवारी, एक चाकू, दोन पिस्तूल आणि ५ राऊंडही जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली मद्यविक्रीचा जिल्ह्यातील पॅटर्न पाहता विशेषकरून यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. ६८६ कारवाया करत १६ हजार ५१९ लिटर देशी, विदेशी दारू, मोह सड़वा बिअर असा १५ लाख १४ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ९ दुचाकी, चार चारचाकी वाहने गुटखा असाही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आठ प्रकरणात पोलिसांनी ९४ लाख ७२ हजार ५४ रुपयांची रोकड जप्त केली आहे. या व्यतिरिक्त मोबाईल, मोटार इंजिन आणि प्लास्टिक पाईप असा मुद्देमालही कारवाईमध्ये जप्त केला आहे. पोलिस प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असून निवडणूक निःपक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडावी तसेच असामाजिक तत्त्वांना अंकुश लागावा, या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सांगितले.