आरोग्यदायी दिवाळी ठरलीया ‘तापदायी!’
दहा महिन्यात जिवघेण्या डेंग्यूचे 200 रुग्ण

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) शासनाने नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेवर जबाबदारी टाकली आहे. परंतु आरोग्य यंत्रणा नियंत्रणाबाहेर गेल्याचे जिल्ह्यात चित्र असून,दहा महिन्यात जिवघेण्या डेंग्यूचे 200 रुग्ण आढळलेत तर चिकनगुनिया 69 तसेच तापीचे एकुण 29442 आढळल्याची नोंद आहे.इतरही आजारांचा आकडा फुगलेला असून,आरोग्यदायी दिवाळी तापदायी ठरत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात एक जानेवारी ते 10 ऑक्टोंबर दरम्यान विविध आजाराने थैमान घातले. जिल्ह्यात डेंग्यूने कहर केला. 200 रुग्ण आढळून आले तरी हिवताप कार्यालया अंतर्गत केवळ जनजागृतीची पत्रके वाटून काही वेळा औषधाची धूरफवारणी करण्यात आली होती.डासअळ्या शोध मोहीम रविण्यात आली होती.परंतु काही भागातील रुग्ण दगावल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. परंतु आरोग्य यंत्रणेने हात झटकून सदर संशयित रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्याचे फार्मान सोडले होते.आरोग्य यंत्रणेची आरोग्यसेवा कागदोपत्री दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.गेल्या दहा महिन्यात मलेरियाचे 8 रुग्ण,टायफाईड 718 तर तब्बल 7145 जणांना श्वान दंश झाला आहे.सध्या थंडी पाय पसरत असून, अनेक दावाखान्यांमधील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे बघायला मिळत आहे.बालकांना सर्दी, खोकला आणि व्हायरल फिव्हरचा त्रास होत आहे. ज्येष्ठांमध्ये वात, कंबरदुखी, मणक्यांचे आजार बळावले आहेत. डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, टायफाइड व डायरियाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते. दिवाळीला फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीमुळे विषारी वायू व धातूंच्या उत्सर्जनामुळे शहरात श्वसनाच्या आजारात झपाट्याने वाढ झाली आहे.याकडे मात्र आरोग्य यंत्रणा दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.