शायर खा. इम्रान प्रतापगढींचे अनोख्या अंदाजात आवाहन ; जाहीर सभेला हजारोंची साद !

चिखली (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):- महायुतीचे सरकार हे महाभ्रष्ट्र असून या धोकेबाज, खोकेबाज सरकारला जनता पायउतार करण्यासाठी सज्ज झाली आहे. मंदिरात भजन आणि मज्जीदीमध्ये दुवा करण्यात येत असून महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीची हवा आहे. राहुल बोंद्रे माझे मित्र असून खास राहुल गांधीजीनी मला त्यांच्या प्रचारासाठी पाठविले. ‘याद रखो शेर पलटके वापस आयेगा’, असे म्हणत चिखली विधानसभा मतदारसंघात राहुल बोंद्रेचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन खा.शायर इम्रान प्रतापगढी यांनी केले.यावेळी हजारोंच्या उपस्थितीने इम्रान प्रतापगढीच्या शायरीला उत्स्फूर्तपणे दाद दिली, हे विशेष!
चिखली विधानसभा मतदारसंघाचे मविआचे अधिकृत उमेदवार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या प्रचारार्थ १५ नोव्हेंबर रोजी धाड येथील आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलतांना खा. इम्रान प्रतापगढी म्हणाले की, एका समाजाच्या ताकदीवर निवडणूक लढवता येत नसून सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागते. त्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्यावे लागते. काँग्रेसहीच भूमिका घेऊन भाजपाला शह देत असल्याचे ते म्हणाले . या परिसरात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांच्या मालाला भाव नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केल्यानंतर कृषी कायदे सरकारने मागे घेतले. महाराष्ट्राला गुजरातच्या रिमोट कंट्रोलने चालविण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट दिल्लीच्या रिमोट कंट्रोलने न चालणारे राज्य आहे. राज्यात मविआचे सरकार येणार असून चिखली विधानसभा मतदारसंघातही राहुल बोंद्रे निवडून येणार असल्याचे खा. इम्रान प्रतापगढी यांनी सांगितले.
▪️रेखाताई खेडेकर म्हणाल्या..राहुलभाऊंचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत गरजेल !
चिखली विधानसभा मतदारसंघाचे मी १५ वर्ष प्रतिनिधीत्व केले, राहुलभाऊही १० वर्ष आमदार होते. तो काळ मतदारसंघातील लोकांसाठी सुवर्णकाळ होता. विकासकामांसोबत मतदारसंघात शांतता होती. मात्र आताचे वातावरण भय आणि भ्रष्टाचाराचे असल्याने मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर म्हणाल्या. राहुलभाऊंच्या पाठिशी सर्व लोकांनी शक्ती एकवटली असून राहुल भाऊ बोंद्रे यांचा आवाज मतदारसंघाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत गरजेल, असेही रेखाताई खेडेकर यांनी सांगितले.
राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले…चिखली विधानसभा मतदारसंघ हा हिंदु- मुस्लिम एकतेचे प्रतिक !
चिखली विधानसभा मतदारसंघ हा हिंदु- मुस्लिम एकतेचे प्रतिक असून हाच बंधूभाव यापुढेही कायम राहणार आहे. धार्मिक धुव्रीकरण करणाऱ्या लोकांचे षडयंत्र कधीच यशस्वी होवू देणार नसल्याचे चिखली विधानसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले. सोयाबीन- कापूस शेतकरी प्रश्नांवर भाजपचे उत्तर बटेंगे तो कटेंगे असे आहे. केंद्र सरकार व महायुती सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी झाले आहे. महाविकास आघाडीचा नारा हा जुडेंगे तो जितेंगे असा असून चिखली विधानसभा मतदार संघात लोक परिवर्तनासाठी सज्ज झाल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले.