विवेकानंद आश्रमात प.पू.शुकदास महाराज जयंती उत्साहात संपन्न
शुकदास महाराज की जय जयघोषाने दुमदुमला परिसर,आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिवरा आश्रम:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- विवेकानंद आश्रमात निष्काम कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांची जयंती अत्यंत भक्तीभावाने व उत्साहात गुरूवारी ता.२८ रोजी संपन्न झाली. सुरूवातील परिसर स्वच्छता करण्यात आली त्यानंतर गावातून दिंडी काढण्यात आली. सकाळी प.पू.शुकदास महाराजांच्या समाधीस्थळी शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी इत्यादींनी समाधीचे दर्शन घेतले. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी सकाळ पासूनच आश्रमात गर्दी केली होती. महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले व त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळालेल्या असंख्य भाविकांना त्यांच्या आठवणीने गहीवरुन आले. महाराजांच्या रुग्णसेवेचा प्रत्यक्ष लाभ झालेले व व्याधीमुक्त झालेल्या लक्षावधी रुग्णांसाठी ते श्रध्दा आणि भक्तीभावाचे प्रतीक बनले आहे. सहभागी भाविकांनी विवेकानंद स्मारक व हरिहरतीर्थ, शिवउद्यानालाही भेट देउन प्रतिमांचे पूजन केले. महाराजांच्या जयंतीनिमित्त आश्रमात मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. ग्रामीण रुग्णालयात संपन्न झालेल्या या शिबीरात 830 रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली. या शिबीरात वैद्यकिय अधिक्षक डॉ.अमित धांडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजिरी पवार, डॉ.बगाडे, डॉ.राठोड, डॉ. जाधव, डॉ. खत्री,डॉ.मंत्री, डॉ.राठोड मॅडम, डॉ.आराख मॅडम, काकडे, गाडेकर इत्यादींनी सहभाग घेतला. जिल्हयातील अनेक डॉक्टरांनी त्यांत आपली बहुमूल्य सेवा दिली. विज्ञान प्रदर्शनीनिमित्त बालवैज्ञानिकांनी विज्ञान प्रदर्शनीत उपकरणांचे प्रदर्शल भरविले.
संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सैन्यदल, पोलिस भरती तथा इतर शासकीय नोकऱ्यासाठी संत शुकदास अकॅडमी नावाने प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. विस्तीर्ण क्रिडांगण, सुसज्ज वाचनालय, तज्ञांचे मार्गदर्शन असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या अकॅडमीचा लाभ घेता येईल. जिल्हाभरातील स्पर्धेत सहभागी वक्त्यांनी दिवसभर आश्रमाचे व्यासपीठ भाषणाने दणाणून सोडले, विषय होता हवामान बदल परिणाम व उपाय. प्रथम बक्षिस आदिवासी माध्यमिक विद्यालय टुणकीची कु.कृष्णाई संतोष नेमाडे,व्दितीय क्रमांक एस.इ.एस विद्यालय सा.खेर्डाचा समर्थ गणेश दानवे, तृतीय महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय दे.माळी कु. अर्पिता अनंता गिऱ्हे तर उत्तेजनार्थ कु.साक्षी मुळे,कु.स्नेहल ताले,कु.स्नेहल सावंत,कु.प्रिया वानेखेड यांना मिळाले. परिक्षक म्हणून शिक्षक भगवान राईतकर,व्ही.एन.मेटांगे,प्रा.गणेश चिंचोले, यांनी काम पाहिले.पी.आर.नपते,संजय जटाले,अभय मासोदकर,निलेश थोरहाते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.ज्ञानेश्वर गाडे यांनी केले. यावेळी हस्तकला, चित्रकला इ. स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सायंकाळी आश्रमाच्या गायक वादकांच्या भक्तीगीत गायन झाले. त्यानंतर ह.भ.प. गजाननदादा शास्त्री महाराजांचे प्रवचन संपन्न झाले. दिवसभरात परीसरातील अनेक मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले.