जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 5 हजार 674 प्रकरणे निकाली
51 कोटी 80 लक्ष रूपयांची तडजोड शुल्क वसूल

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 902 प्रलंबित व 4 हजार 772 दाखलपूर्व अशा एकूण 5 हजार 674 प्रकरणात समेट घडून आला. त्यात एकूण 51 कोटी 80 लक्ष 43 हजार 981 रूपयांची तडजोड शुल्क वसूल झाली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा तथा वकील संघ बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 डिसेंबर 2024 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालत मध्ये बँक, ग्रामपंचायत, नगर परिषद तसेच वाहतुक शाखा, भारतीय दुरसंचार निगम आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे दाखलपूर्व 51 हजार 575 प्रकरणे दाखल झाले होते. त्यापैकी 4 हजार 772 प्रकरण निकाली निघाली असून रुपये 2 कोटी 40 लक्ष 80 हजार 474 रुपये तडजोड शुल्क वसुल करण्यात आले. न्यायालतील प्रलंबित प्रकरणे 13 हजार 559 रुपये ठेवण्यात आले असून त्यापैकी 902 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून एकूण रुपये 49 कोटी 39 लक्ष 63 हजार 507 रुपये तडजोड शुल्क वसुल करण्यात आले. असे एकूण बुलढाणा जिल्ह्यात 65 हजार 134 प्रकरणे ठेवण्यात आले. त्यापैकी एकूण 5 हजार 674 प्रकरणे निकाली काढण्यात आले असून 51 कोटी 80 लक्ष 43 हजार 981 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
बुलढाणा येथे तिसरे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर डी.पी. काळे, यांचे पॅनल क्र. तीनवर भुसंपादन प्रकरण रे.द.क्र. 253/2024 किसनराव संतोषराव भुतेकर व इतर 3-वि- महाराष्ट्र शासन व इतर 2 या प्रकरणामध्ये आपसात होवून संपादीत केलेल्या जमीनीचा मोबदला म्हणून एकूण 36 कोटी 64 लक्ष रुपये महाराष्ट्र शासनातर्फे अर्जदारास देण्याचे ठरले. सदर प्रकरणातील पक्षकारांचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष एस.सी. मुनघाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष एस.सी. मुनघाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा न्यायाधीश-01 आर.एन. मेहेरे, बुलढाणा, मुख्य न्यादंडाधिकारी एस.आर. गायकवाड, तीसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बुलढाणा डी.पी.काळे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्र, बुलढाणा पी.बी. देशपांडे, चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, बुलढाणा पी.ए.खंडारे, असे एकूण 5 पॅनल तयार करण्यात आले होते. सदर पॅनलवर ॲड. रत्नमाला गवई, ॲड आरीफ युसुफ सैय्यद,ॲड ए.एस.इंगळे, ॲड एस.टी. इंगळे व ॲड एस.एस.तायडे यांनी सहाय्यक पंच म्हणूना काम पाहिले. बुलढाणा जिल्हा वकील संघाचे सर्व विधिज्ञांनी राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्याकरीता योगदान दिले.
राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वीरित्या आयोजन पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील तसेच जिल्ह्याचे सर्व वकील संघाचे विधीज्ञ, बँकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.