वरवंड ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार…
सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर वसूल पात्र रकमाही काढल्या, कारवाई होत नसल्यामुळे 26 जानेवारीला आत्मदहनाचा इशारा.....

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी): ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विकास कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. यांच्या विरोधात कित्येक वर्षापासून तक्रारी चालू असून या तक्रारीवर अधिकाऱ्यांनी समिती नेमणूक केली होती त्या समितीने (स्पॉटवर) जागेवर जाऊन मोका पाहणी केल्यानंतर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अनेक प्रकारचे कामे केलेले असल्याचे दाखविले होते मात्र त्या ठिकाणी ते दिसून न आल्यामुळे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर वसूल पात्र रकमा काढण्यात आलेल्या होत्या. या वसूल पात्र रकमा आद्यपही शासनाच्या खात्यात जमा न केल्यामुळे आता जिल्हा परिषदेला येथे लेखी स्वरुपात मध्ये निवेदन देण्यात आलेले आहे.
निवेदनात मध्ये असे म्हटले आहे की.तक्रराकर्ते वरवंड येथील कायम रहिवाशी असून कायद्याचे तंतोतंत पालन करणारे नागरिक आहोत. गावाचा विकास व्हावा, गावातील नागरिकांना सोयी, सुविधा मिळाव्यात याकरिता शासनाकडून लाखो रुपयाचा निधी विविध घटकाअंतर्गत पुरविल्या जातो. अशातच ग्राम पंचायत वरवंड यांना शासनाच्या निधीतून १४ वा वित्त आयोगामधून लाखो रुपयाचा निधी प्राप्त झाला होता, मात्र तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने अफरातफर करुन मोठ्या प्रमाणात अनियमितता करुन भ्रष्टाचार केला आहे. याबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा केल्याने शासनाकडून वसूल पात्र रक्कम सुध्दा संबंधीतांकडून वसुल करण्यात यावी, याबाबत समितीव्दारे अहवाल सुध्दा देण्यात आला. मात्र अद्यापपावेतो वसुलपात्र रक्कम संबंधीतांकडून वसूल करण्यात आली नाही व शासनखाती सुध्दा जमा करण्यात आली नाही.
संबंधीत प्रकरणी आपले स्तरावरुन सखोल चौकशी होवून सदरहू वसूल पात्र रक्कम शासन खाती जमा करणेबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी व संबंधीतांवर कडक कार्यवाही करण्यात यावी. सदरहू प्रकरणाची ०७ दिवसाचे आत दखल घेण्यात यावी. अन्यथा दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी आपले कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात येईल.अशी माहिती निवेदनामध्ये देण्यात आलेली आहे.